पाणीसाठा कमी; रब्बी हंगाम धोक्यात
----
सकाळ वृत्तसेवा
नांदेड, ता. १२ : जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या पेरणीची तयारी सुरू झाली असली, तरी अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कृषी विभागाने यंदा ३ लाख ९३ हजार ८९० हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचे नियोजन केले आहे. मात्र, बहुतांश प्रकल्पांतील पाणीसाठा निम्म्याच्या आसपास असल्याने पेरणीनंतर पिकांना पाणी मिळण्याबाबत अनिश्चितता आहे.
रब्बी हंगामात हरभऱ्याचे २ लाख ६९ हजार १०९ हेक्टर, गव्हाचे ५६ हजार ६४३ हेक्टर, रब्बी ज्वारीचे ४१ हजार ९४० हेक्टर, मक्याचे १५ हजार ८५४ हेक्टर आणि करडईचे ८ हजार २३२ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. याशिवाय सूर्यफूल, रब्बी तीळ, मोहरी आणि इतर पिकांचाही समावेश आहे. पावसाचे कमी प्रमाण आणि घटता पाणीसाठा लक्षात घेता, नियोजित क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी किती होईल, हे आगामी काळातील पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून राहणार आहे.
----
पिण्याच्या पाण्याला प्राधान्य
जिल्ह्यातील उपलब्ध पाणीसाठ्यातून पिण्याच्या पाण्यासाठी साठा राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सिंचनासाठी पाणी सोडण्याच्या वेळापत्रकाबाबत अनिश्चितता आहे. विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी घटल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. उपलब्ध पाणी किती दिवस पुरेल, याची शाश्वती नसल्याने रब्बीची पेरणी करावी की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
----
रब्बी पेरणीचे नियोजन (हेक्टरमध्य)
हरभरा : २,६९,१०९
गहू : ५६,६४३
रब्बी ज्वारी : ४१,९४०
मका : १५,८५४
करडई : ८,२३२
सूर्यफूल : १०३
रब्बी तीळ : ९१
मोहरी : २८
इतर पिके : १,८९०
एकूण : ३,९३,८९०