उमरीत श्वानदंश प्रतिबंध व जनजागृती मोहीम
---
‘रेबीज मुक्ती मिशन २०३०’ अंतर्गत उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनचा उपक्रम
---
नांदेड, ता. १८ : श्वानदंशाच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि रेबीजविषयी नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनतर्फे उमरी येथील के. डी. बॉस येथे श्वानदंश प्रतिबंध व जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष ॲड. दगडू लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘रेबीज मुक्ती मिशन २०३०’ अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मोहिमेदरम्यान श्वानदंश टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी, भटक्या श्वानांशी सुरक्षितपणे वागण्याची पद्धत आणि श्वानदंश झाल्यानंतर तातडीने वैद्यकीय उपचार घेण्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
मानव आणि प्राणी यांच्यात सुरक्षित सहअस्तित्व निर्माण करण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. श्वानदंश झाल्यास जखम साबण आणि वाहत्या पाण्याने किमान १५ मिनिटे धुऊन तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. रेबीजचा धोका टाळण्यासाठी वेळेत उपचार घेणे महत्त्वाचे असल्याचेही अधोरेखित करण्यात आले. या उपक्रमाला उमरी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि एनडीसी बँकेचे संचालक कैलास भाऊ देशमुख गोरटेकर, नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष प्रवीण सरडा, नगरसेवक साईनाथ दादा जमदारे, नगर परिषद गटनेते राजेश जाधव, गुरुकृपा हॉस्पिटलचे प्रवक्ते डॉ. शुभम सूर्यवंशी, सदाशिव मंत्रीवाड आणि रोहित सामलवार यांचे सहकार्य लाभले.