रब्बी पीक विमा योजनेसाठी
युनायटेड इंडिया इन्शुरन्सची निवड
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता.९ ः प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०२६-२७ साठी जिल्ह्यात राबविण्यासाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडची निवड करण्यात आली आहे. ही योजना बीड पॅटर्ननुसार (कप अँड कॅप मॉडेल ८०-११०) राबविण्यात येणार असून, शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी व कृषी विभागाने केले आहे.
या योजनेत अन्नधान्य व गळीत धान्य पिकांसाठी शेतकरी विमा हप्ता १.५ टक्के, तर नगदी पिकांसाठी ५ टक्के आहे. सर्व अधिसूचित पिकांसाठी ७० टक्के जोखीम स्तर निश्चित केला आहे. योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. कुळाने किंवा भाडेपट्ट्याने शेती करणाऱ्यांनाही सहभाग घेता येणार आहे. परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारी, गहू, हरभरा व उन्हाळी भुईमूग ही पिके अधिसूचित आहेत. गव्हासाठी हेक्टरी १८० रुपये, ज्वारी व हरभऱ्यासाठी प्रत्येकी ५४० रुपये, तर उन्हाळी भुईमुगासाठी ४०.६० रुपये विमा हप्ता आहे. ज्वारीसाठी ३० नोव्हेंबर, गहू व हरभऱ्यासाठी १५ डिसेंबर, तर उन्हाळी भुईमुगासाठी ३१ मार्च २०२७ ही अर्जाची अंतिम मुदत आहे. अर्जासाठी फार्मर आयडी, इ-पीक पाहणीतील पीक नोंदणी अनिवार्य आहे. सामाइक सुविधा केंद्रांवर विनाशुल्क ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अधिक माहितीसाठी ०२४५२-२४२२०७ या क्रमांकावर संपर्क साधावा.
------------