भोसलेंच्या मुलींच्या शिक्षणाची
जबाबदारी घेणार राहुल पाटील
पूर्णा, ता. १५ (बातमीदार) : तालुक्यातील सुहागन येथील गणेश साहेबराव भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर रविवारी आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबीयांची खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ. राहुल पाटील यांनी सोमवारी (ता. १४) सांत्वनपर भेट घेतली.
खासदार जाधव यांनी शिवसेनेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत दोन लाख रुपयांची आर्थिक मदत केली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, माजी शिक्षण सभापती गंगाप्रसाद आणेराव, उपजिल्हा प्रमुख दशरथ भोसले, हिराजी भोसले, रामराजे भोसले, गोविंद सोलव, गणेश भोसले, दौलत भोसले, माउली भोसले आदींची उपस्थित होती. आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दोन्ही मुलींच्या शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी घेण्याचा मनोदय व्यक्त केला. दरम्यान, गणेश भोसले (वय ४५) यांनी मराठा आरक्षणावर तोडगा निघत नसल्याने खिशात चिठ्ठी लिहून रविवारी (ता. १३) शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. भोसले यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व भाऊ असा परिवार आहे.
-----
मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळे समाजातील तरुणांनी टोकाचे पाऊल उचलू नये. आरक्षणासाठी आम्ही समाजासोबत लढा देत आहोत. या प्रश्नावर योग्य तो तोडगा निघेल. शासनाने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर लवकर योग्य तो तोडगा काढावा.
-संजय जाधव, खासदार