पिके करपली, बोंडगळ वाढली; पोळ्याच्या बाजारातही शुकशुकाट

पिके करपली, बोंडगळ वाढली; पोळ्याच्या बाजारातही शुकशुकाट
Published on
पावसाची ओढ; बळिराजाचा जीव टांगणीला ---- पिके करपली, बोंडगळ वाढली; पोळ्याच्या बाजारातही शुकशुकाट --- पैठण, ता. ६ (बातमीदार) : खरिपाच्या सुरवातीला झालेल्या दमदार पावसामुळे आशावादी झालेल्या शेतकऱ्यांना आता दीर्घ पावसाच्या खंडाने मोठा धक्का बसला आहे. पैठण, सोयगाव व खुलताबाद तालुक्यांत पिके निर्णायक अवस्थेत असताना जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. कपाशी, सोयाबीन, मूग, मका, तूर आदी पिकांवर पाण्याचा ताण जाणवत असून रोगराईचाही प्रादुर्भाव वाढला आहे. पैठण तालुक्यात कपाशीला बोंडधारणा झाली असली, तरी पावसाअभावी बोंडगळ सुरू झाली आहे. खर्च करून उभे केलेले पीक डोळ्यांदेखत वाळताना पाहून शेतकरी चिंतेत आहेत. सोयगाव तालुक्यात कपाशी, मका व मूग पिकांची अवस्था बिकट झाल्याने काही शेतकऱ्यांनी पिकांवर औत फिरवले आहे. जून ते ऑगस्टदरम्यान सोयगाव तालुक्यात ३८२.८ मिलिमीटर, म्हणजे सरासरीच्या ७४.५ टक्के पाऊस झाला. मात्र, पावसाचे वितरण असमान राहिले. ४ ते १७ सप्टेंबरदरम्यानही पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज असल्याने चिंता वाढली आहे. सोयाबीनवर अळी, मुगावर चिकटा अळी, कपाशीवर मावा-तुडतुडे आणि मक्यावर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. फवारणी, खुरपणी व निंदणीचा खर्च वाढला असून मजूरटंचाईही कायम आहे. कृषितज्ज्ञांनी उपलब्ध पाण्याचा वापर करून कपाशी व सोयाबीनला संरक्षित सिंचन करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, पोळा सणावरही दुष्काळाचे सावट आहे. बैलांच्या सजावटीचे साहित्य बाजारात दाखल झाले असले, तरी शेतकऱ्यांच्या खरेदीला प्रतिसाद कमी आहे. वाढता खर्च, शेतमालाला अपेक्षित भाव न मिळणे आणि पिकांच्या नुकसानीची भीती यामुळे पोळ्याचा उत्साह मंदावला आहे. --- पैठण कपाशीची बोंडगळ वाढली पैठण तालुक्यात पावसाच्या दीर्घ खंडामुळे जमिनीतील ओलावा संपला असून, कपाशीच्या बोंडगळीस सुरवात झाली आहे. त्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. ---- ४२ हजार हेक्टरवर पिके सोयगाव तालुक्यात यंदा कपाशीसह तब्बल ४२ हजार ४३४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मात्र, पिके उत्पादनाच्या निर्णायक टप्प्यात असतानाच पावसाने ओढ दिली आहे. --- पोळ्याच्या बाजारात शुकशुकाट बैलांच्या सजावटीसाठी रंग, गोंडे, झूल, वेसण आणि घुंगरांची दुकाने सजली आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींमुळे खरेदीचा उत्साह कमी असल्याने व्यापाऱ्यांचे आर्थिक गणितही बिघडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com