बलात्काराचा गुन्हा खंडपीठाकडून रद्द
छत्रपती संभाजीनगर, ता. १५ : लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपावरून दाखल झालेला बलात्काराचा गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती सुशील एम. घोडेस्वार यांनी रद्द केला.
मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात २७ जुलै २०२५ला भरत प्रभाकर राठोड याच्याविरुद्ध बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. तक्रारदार ३९ वर्षीय महिलेची २०१५ मध्ये भरतशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यांनी संयुक्तपणे फ्लॅट खरेदी केला आणि २०१६ पासून तेथे पती-पत्नीप्रमाणे राहू लागले. लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले, त्यातून गर्भधारणा झाल्यानंतर गर्भपात करण्यास भाग पाडले, असा महिलेचा आरोप होता. भरतची उदगीर येथे बदली झाल्यानंतरही संबंध कायम होते. लग्नाबाबत विचारणा केल्यावर तो टाळाटाळ करीत असल्याचे तक्रारीत म्हटले होते. २०२३ मध्ये भरतचा भाऊ व त्याच्या मित्राने मारहाण करून धमकी दिल्याचाही आरोप होता. पोलिसांनी तपासानंतर आरोपपत्र दाखल केले होते. हा गुन्हा आणि पुढील खटला रद्द करण्यासाठी भरतने ॲड. विजय लटंगे यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात अर्ज केला. राज्यातर्फे अतिरिक्त सरकारी वकील भारती गुंजाळ, तर फिर्यादीतर्फे ॲड. सोनल बाली व ॲड. ए.ए. जोशी यांनी विरोध केला.