औरंगाबाद - स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत शहरात सुमारे ७०० सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. मुख्य रस्ते, सिग्नल व महत्त्वाच्या चौकात बसविण्यात आलेल्या या कॅमेऱ्यांमुळे पोलिसांचा शहरावर २४ तास वॉच आहे. त्यासोबतच आता फेस रीडिंग, नंबर प्लेट रीडिंगचे १६० अत्याधुनिक सुविधा असणारे कॅमेरे सिग्नलवर बसविले जाणार आहेत. त्यामुळे एखादा गुन्हेगार शहरात कुठे फिरला हे फेस रीडिंगद्वारे पोलिसांना शोधता येईल. तसेच एनपीआर (ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकॉन्सिलिएशन) सिग्नल तोडणारे व वाहतुकीचा नियम मोडणाऱ्यांना थेट पावती मिळणार आहे.
स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत एमएसआय (मास्टर सिटी इंटिग्रेटड) उपक्रम हाती घेण्यात आला. त्यात सुमारे पावणेदोनशे कोटी रुपये खर्च करून ४१८ ठिकाणी ७०० सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात आले. पोलिस आयुक्तांच्या हद्दीपर्यंतचे रस्ते, चौक यात कव्हर करण्यात आले आहेत. त्यासोबतच आता ही यंत्रणा अपग्रेड केली जाणार आहे. त्यासाठी आणखी १६० अत्याधुनिक कॅमेरे शहरातील सिग्नलवर बसविले जाणार आहेत. त्यामुळे यापुढे शहरात रहदारीचे नियम मोडणाऱ्यांची पावती पोलिस कर्मचारी नाही तर थेट सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे फाडली जाणार आहे. एएनपीआर (ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकॉन्सिलिएशन) कॅमेरे वाहनाची नंबर प्लेट स्कॅन करतील व वाहनचालकाने केलेल्या वाहतूक उल्लंघनाची नोंद करून त्याचा फोटो त्या दिवसाची तारीख आणि वेळेसह थेट नियंत्रण कक्षाला पाठवतील. येथून पावती तयार करून चालकाच्या पत्त्यावर पाठविले जाणार आहे. त्यात ओव्हरस्पीड ड्रायव्हिंग, स्पीड बाइकिंग, बाइक स्टंट, हिट अँड रन, चेन स्नॅचिंग यासारख्या घटनांवर २४ तास पोलिसांची नजर असेल. अनेक वाहनचालक रात्रीच्या वेळी शहरातील रस्त्यांवर भरधाव वेगाने वाहने चालवतात. ताशी ४० किलोमीटरचा वेग असल्यास ते कॅमेऱ्याद्वारे रेकॉर्ड केले होईल. काही कॅमरे फेस रीडिंगचे राहणार आहेत. एखादा गुन्हेगार गुन्हा करून फरार होतो. अशा गुन्हेगाराचा फोटो स्कॅन केल्यास तो शहरातून कोणत्या रस्त्याने कोणत्या दिशेने गेला याचा शोध पोलिसांना घेता येईल. तसेच आरएलव्हीडी (लाल प्रकाश उल्लंघन शोध) कॅमरे बसविले जाणार असल्याचे स्मार्ट सिटीचे प्रकल्प अभियंता फैज अली यांनी सांगितले.
२४ कोटींचा खर्च
एमएसआय प्रकल्प १७४ कोटींचा होता. आता २४ कोटी ३५ लाख रुपये खर्च करून एएनपीआर व फेस रीडिंगचे कॅमरे बसविले जात आहेत. यापूर्वी बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्याद्वारे देखील झूम करून वाहनांचा क्रमांक ओळखता येतो; पण आता स्पीडमधील वाहनांचे नंबर रीड होतील, असे फैज अली यांनी सांगितले. या कॅमेऱ्यांसाठी पोलिस आयुक्तालयात कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटर चोवीस तास कार्यरत आहे.