पान ४ अँकर
-----
बाजार समितीत कडधान्ये आणि भरडधान्यांना विक्रमी भाव
मर्यादित आवक, पण दरात मोठी तेजी; तूर १० हजारांवर, तर सोयाबीन सात हजार पार
सकाळ वृत्तसेवा
बीड, ता. २९ ः जिल्ह्यामध्ये यंदा पावसाने ओढ दिल्याने आणि भूजल पातळी मोठ्या प्रमाणावर खालावल्यामुळे शेतीमालाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. मात्र, उत्पादनातील या घटीमुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमालाची दैनंदिन आवक मर्यादित राहिली असली, तरी बाजारात उपलब्ध असलेल्या शेतमालाला अतिशय समाधानकारक आणि उच्चांकी भाव मिळत आहे. सध्या बाजारात ज्वारी, हरभरा, तूर, सोयाबीन, मूग आणि उडदाला व्यापाऱ्यांकडून मागणी वाढल्यामुळे शेतमालाला खऱ्या अर्थाने ''अच्छे दिन'' आल्याचे चित्र बीडमध्ये पाहायला मिळत आहे. बाजारातील या तेजीत तुरीचे दर थेट १० हजार रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले असून, सोयाबीनचे सौदेही सात हजार रुपयांपर्यंत होत आहेत.
बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ताज्या आकडेवारीनुसार, सध्या कडधान्यांसह भरडधान्यालाही मोठी मागणी नोंदवली जात आहे. मागणी आणि पुरवठ्यातील या तफावतीमुळे दरात मोठी वाढ झाली आहे. विशेषतः तुरीला दहा हजार रुपयांचा विक्रमी भाव मिळत आहे. उडीद आणि मुगाच्या दरातही मोठी तेजी असून, या दोन्ही शेतमालांना प्रति क्विंटल ९ हजार ते ९ हजार ५०० रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे. हरभऱ्याचे दर ६ हजार ते ७ हजार १०० रुपये प्रति क्विंटलवर स्थिर आहेत. तसेच, करडई ६,११० रुपये, गहू ४,००१ रुपये आणि बाजरी ३,७५५ रुपये प्रति क्विंटल या दराने विकली जात आहे. या विक्रमी दरामुळे, आवक कमी असली तरी, ज्या शेतकऱ्यांकडे शेतमाल उपलब्ध आहे, त्यांना चांगला आर्थिक दिलासा मिळत आहे.
------
ज्वारी गाठणार शंभरीचा टप्पा
यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे आणि पावसाळ्यातील खंडाचा थेट फटका बसल्याने ज्वारीच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. परिणामी, बाजारात ज्वारीची आवक खूपच कमी झाली असून दर थेट दुपटीवर गेले आहेत. सध्या बाजार समितीत ज्वारीला प्रति क्विंटल किमान सात हजार सातशे ते कमाल आठ हजार रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे. बाजारातील ही ज्वारीची टंचाई आणि ग्राहकांकडून होणारी वाढती मागणी लक्षात घेता, येत्या काळात किरकोळ बाजारात ज्वारीचे भाव प्रति किलो १०० रुपयांचा (१० हजार रुपये प्रति क्विंटल) टप्पा सहज गाठू शकतील, असा अंदाज स्थानिक धान्य व्यापारी सतीश दुबाले यांनी व्यक्त केला आहे.
---------
रब्बी उत्पादनावर मोठा परिणाम
जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिल्याने विहिरी, बोअरवेल आणि अन्य नैसर्गिक जलस्रोतांच्या पाण्याच्या पातळीत मोठी घट झाली आहे. बहुतांश जलस्रोत आटल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना त्यांच्या वाढीच्या टप्प्यात पुरेसे पाणी देणे शेतकऱ्यांना शक्य झाले नाही. पाण्याची उपलब्धता नसल्याने एकरी उत्पादकता मोठ्या प्रमाणावर घटली आहे. यामुळे बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या धान्याची एकूण आवक प्रचंड रोडावली आहे. मात्र, आवक कमी असली तरी बाजारात शेतमालाला चांगला उठाव असल्याने शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे समाधानकारक पडत आहेत.
-----
बाजार समितीतील दर (प्रति क्विंटल)
तूर : १०,००० रुपये
मूग आणि उडीद : ९,००० ते ९,५०० रुपये
सोयाबीन : ७,००० रुपये
ज्वारी : ७,७०० ते ८,००० रुपये
हरभरा : ६,००० ते ७,१०० रुपये
करडई : ६,११० रुपये
गहू : ४,००१ रुपये
बाजरी : ३,७५५ रुपये