नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार
----
‘महावितरण मोबाइल ॲप’वर वीजग्राहकांसाठी सोय
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. ६ ः : शेतकरी आणि सर्वसामान्य वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरणने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कोणत्याही भागातील नादुरुस्त किंवा बंद पडलेल्या रोहित्राची (ट्रान्सफॉर्मर) माहिती थेट ‘महावितरण मोबाइल अॅप’द्वारे एका क्लिकवर देण्याची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे नादुरुस्त रोहित्र ताबडतोब बदलणे किंवा दुरुस्त करणे लवकर शक्य होणार आहे. या ॲपद्वारे कोणालाही कोणत्याही ठिकाणच्या नादुरुस्त रोहित्राची माहिती देता येणार आहे. यासह महावितरणच्या www.mahadiscom.in वेबसाइटवर किंवा कॉल सेंटरमध्येदेखील तक्रार नोंदविण्याची सोय उपलब्ध आहे.
महावितरणने नादुरुस्त रोहित्र बदलण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. नादुरुस्त किंवा बंद पडलेल्या रोहित्राची माहिती प्राप्त होण्यास विलंब होत असल्याचे दिसून आले. त्याची गंभीर नोंद घेत मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी नादुरुस्त रोहित्रांची माहिती कळविण्यासाठी नागरिकांना ‘महावितरण मोबाइल ॲप’द्वारे खास सोय उपलब्ध करून देण्याची सूचना केली. त्याप्रमाणे ही सुविधा ॲपवर कार्यान्वित झाली आहे.
महावितरणकडून राज्यभरातील ९ लाख २५ हजार वितरण रोहित्रांचे (डीटीसी) जिओ लोकेशनसह मॅपिंग पूर्ण झाले आहे. त्यामुळे केवळ लोकेशनच्या आधारे नादुरुस्त रोहित्रांची माहिती देणे कोणालाही ‘महावितरण मोबाइल ॲप’द्वारे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे हे ॲप डाऊनलोड केलेल्या सर्व मोबाइलधारकास कोणत्याही ठिकाणच्या बंद किंवा नादुरुस्त रोहित्रांची माहिती कळविण्याची सोय मराठी व इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे.
मोबाइल ॲपसोबतच नादुरुस्त रोहित्राची तक्रार किंवा माहिती देण्याची सोय महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाइटवर, संबंधित कार्यालय किंवा ग्राहक सुविधा केंद्रामध्ये किंवा २४ तास सुरू असलेल्या १८००२१२३४३५/ १८००२३३३४३५/ १९१२ किंवा १९१२० या टोल फ्री क्रमांकावर उपलब्ध आहे. वेबसाइटवर ग्राहक रकान्यात जाऊन ‘ऑनलाइन तक्रार नोंदवा’मध्ये ग्राहक क्रमांकाशी संबंधित रोहित्र नादुरुस्त झाल्याची तक्रार नोंदविता येईल. यासह या वेबसाइट किंवा महावितरण मोबाइल ॲपवरील ‘ऊर्जा चॅट बॉट’द्वारेदेखील इतर तक्रारींसोबतच मराठी व इंग्रजी संवादाद्वारे तक्रार दाखल करण्याची सोय उपलब्ध आहे. या सुविधेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
------