सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला सव्वासात लाखांना गंडविले
मोबाइल हॅक करत दोन बॅंकेचे खाते अन् क्रेडिट कार्डचा वापर
छत्रपती संभाजीनगर, ता. १ ः सातारा परिसर भागातील एका ७४ वर्षीय सेवानिवृत्ताचा मोबाइल हॅक करून दोन बॅंंकेच्या खात्याचा वापर करून सायबर भामट्यांनी तब्बल सव्वासात लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
दिलीपकुमार बिष्णनाथ घोष (वय ७४, रा. इंद्र अमृत ऑरेंज सिटी, सातारा परिसर, पैठण रोड) यांचे आयसीआयसीआय आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बँक खाते आहे. ते आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्डही वापरतात. १४ ऑक्टोबरला रात्री घरी असताना अचानक त्यांच्या ई-मेलवर बँक खात्यातून पैसे जात असल्याबाबतचे संदेश येऊ लागले. तपासणी केली असता, अज्ञात व्यक्तीने त्यांचा मोबाइल हॅक करून त्यांच्या दोन बॅंक खाते आणि क्रेडिट कार्डचा वापर करून एकूण ७ लाख ३० हजार ४६३ रुपयांचे ऑनलाइन व्यवहार झाले. हा प्रकार लक्षात येताच दिलीपकुमार यांनी तत्काळ बँकांशी संपर्क साधत खाती व डेबिट व्यवहार सुरक्षित केले. परंतु, तोवर सुमारे सव्वासात लाखांचे व्यवहार झाले होते. याप्रकरणी घोष यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून, तपास पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे हे करत आहेत.