गावातील बंद पडलेले हातपंप दुरुस्त करा
पशुधनासाठी द्या पाणी : शेंदूरवादा सर्कलमधील नागरिकांची मागणी
-----
शेंदूरवादा, ता. २१ (बातमीदार) : गंगापूर तालुक्यातील शेंदूरवादा जि.प. सर्कलध्ये यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता आहे. अनेक गावांतील हातपंप बंद अवस्थेत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बंद हातपंपांची तातडीने दुरुस्ती करावी, तसेच पशुधनासाठी पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
गुरु धानोरा, भगतवाडी, माळवाडी, कदम शहापूर, मुरमी, दहेगाव, शेंदूरवादा, धामोरी, नागापूर, मांडवा, तांदुळवाडी, सावखेडा, मांगेगाव, कोडापूर आणि ढोरेगाव या गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे. परिसरातील बंद हातपंप दुरुस्त करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी संबंधित यंत्रणा आणि ग्रामपंचायतींनी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
-----
पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर
परिसरात शेळी-मेंढीपालनासह गायी-म्हशींचा दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र, पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने जनावरांच्या चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. पशुपालकांना जनावरांसाठी पाणी मिळविण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील मोक्याच्या ठिकाणी पशुधनासाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ताराचंद दुबिले, आप्पासाहेब वल्ले, कृष्णा वल्ले, संतोष विधाते, विठ्ठल बोरुडे, सचिन उचित, राजेंद्र गावंडे, एकनाथ खंडागळे, कारभारी दुबिले, काकासाहेब नरवडे, अकील पठाण आणि कैलास म्हस्के यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
-----
बंद हातपंपांच्या दुरुस्तीसाठी पंचायत समितीकडे पाठपुरावा करण्यात येईल. ग्रामपंचायतींनी हातपंप दुरुस्ती आणि पशुधनासाठी पाण्याची व्यवस्था करण्याबाबत लेखी मागणी करावी. ही मागणी कळविल्यास आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. ग्रामपंचायत, कार्यकर्त्यांनीही दुष्काळी उपाययोजनांचे नियोजन करावे. सर्वांनी एकत्रित प्रयत्न करून दुष्काळी संकटावर मात करावी.
-कृष्णा पाटील डोणगावकर, जि.प. सदस्य