
नांदेड : तांडा वस्तीच्या निधी वाटपावरून पालकमंत्री अतुल सावे यांच्या विरोधात भाजपच्याच दोन आणि शिवसेनेच्या एका आमदाराने जाहीररीत्या नाराजी व्यक्त केली. पालकमंत्र्यांनी तिन्ही आमदारांची समजूत काढणे आवश्यक होते. परंतु, भाजपच्या आमदाराबद्दल चकार शब्दही न काढता त्यांनी शिवसेनेलाच वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. ‘‘ज्यांना महायुतीमध्ये राहायचे ते राहतील, ज्यांना बाहेर पडायचे ते पडतील, आमच्याकडे २३७ आमदार आहेत’’, असा इशारा पालकमंत्र्यांनी दिला. या वक्तव्यानंतर भाजपच्याच काही आमदारांनी विरोध केल्याने महायुतीत बेबनाव निर्माण झाला आहे. पालकमंत्र्यांविरोधात शिवसेनेच्या आमदारांनी दंड थोपटत पालकमंत्र्यांना महायुतीवर बोलण्याचा अधिकार कुणी दिला? असा सवाल केला आहे.