वंध्यत्वाचे वाढते प्रमाण आणि आधुनिक उपचारांची दिशा ः डॉ. अनुराधा शेवाळे
----
पहिला इंट्रो
डॉ. अनुराधा शेवाळे ज्येष्ठ स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ज्ञ आहेत. त्यांनी वर्ष २००१ मध्ये मराठवाड्यात पहिल्या आयव्हीएफ केंद्राची यशस्वीरीत्या पायाभरणी केली. त्यांच्या या वैद्यकीय प्रवासात आता त्यांच्या कन्या डॉ. अपूर्वा शेवाळे याही नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करत सक्रिय झाल्या आहेत. डॉ. अपूर्वा यांनी वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून मातृत्वाचे स्वप्न पाहणाऱ्या महिलांसाठी ‘एग फ्रीजिंग’सारखे नवे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
दुसरा इंट्रो
एकेकाळी केवळ १० ते १५ टक्के दांपत्यांमध्ये आढळणारी वंध्यत्वाची समस्या आजच्या काळात बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव, आणि प्रदूषणामुळे ३० टक्क्यांपर्यंत वाढली आहे. डॉ. अनुराधा शेवाळे आणि डॉ. अपूर्वा शेवाळे यांनी वंध्यत्वाच्या वाढत्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त केली. त्यांनी आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रवास, पीसीओडीसारख्या समस्या, उशिरा होणारी लग्ने आणि कोविडनंतर स्त्रीबीजांच्या गुणवत्तेवर झालेला परिणाम यावर सविस्तर प्रकाश टाकला आहे.
------
एकेकाळी वंध्यत्वाची समस्या केवळ १० ते १५ टक्के दांपत्यांमध्ये आढळत होती. मात्र, बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव, प्रदूषण, भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि उशिरा होणारी लग्ने यामुळे हे प्रमाण जवळपास ३० टक्क्यांपर्यंत पोचले. अशा परिस्थितीत आयव्हीएफ (इन विट्रो फर्टिलायझेशन) तंत्रज्ञान हजारो दांपत्यांसाठी पालक होण्यासाठी आशेचा किरण ठरत आहे, असे मत ज्येष्ठ स्त्रीरोग आणि वंध्यत्व तज्ज्ञ डॉ. अनुराधा शेवाळे आणि या क्षेत्रातील नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉ. अपूर्वा शेवाळे यांनी व्यक्त केले.
वर्ष १९७८ मध्ये जगातील पहिले टेस्ट ट्यूब बाळ जन्माला आल्यानंतर आयव्हीएफ तंत्रज्ञानाने मोठी झेप घेतली. सुरवातीच्या काळात यशाचे प्रमाण अत्यल्प होते. मात्र, आज आयव्हीएफमध्ये ६० ते ७० टक्क्यांपर्यंत यश मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाड्यात वर्ष २००१ मध्ये सुरू झालेल्या पहिल्या आयव्हीएफ केंद्राच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी सांगितले की, सुरवातीच्या चार रुग्णांपैकी एका रुग्णाला यशस्वी गर्भधारणा झाली आणि त्यानंतर या क्षेत्रातील कार्याला गती मिळाली. पुढे २००३ मध्ये आयसीएसआय तंत्रज्ञान, त्यानंतर एम्ब्रिओ आणि ओसाइट फ्रीजिंगसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्याने उपचारांची परिणामकारकता वाढली. वंध्यत्व वाढण्यामागे पुरुषांमध्ये तंबाखू, मद्यपान, वाढता ताण, प्रदूषण आणि अन्नातील रासायनिक घटक कारणीभूत आहेत. त्यामुळे शुक्राणूंची गुणवत्ता कमी होत आहे. महिलांमध्ये पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस), हार्मोनल असंतुलन, वाढते वजन, उशिरा होणारी लग्ने आणि करिअरमुळे मातृत्व पुढे ढकलण्याची प्रवृत्तीही वाढत आहे. ३० वर्षांनंतर स्त्रीबीजांची संख्या आणि गुणवत्ता झपाट्याने कमी होत असल्याने महिलांनी २५ ते ३० वर्षांच्या दरम्यान मातृत्वाचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
वंध्यत्व हा केवळ महिलांचा प्रश्न नाही. ५० टक्के प्रकरणांमध्ये पुरुष आणि ५० टक्के प्रकरणांमध्ये महिलांची कारणे आढळतात. त्यामुळे उपचारासाठी पती-पत्नी दोघांची तपासणी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच कोविडनंतर स्त्रीबीजांची संख्या आणि गुणवत्ता कमी झाल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले. करिअरमुळे लग्न आणि मातृत्व पुढे ढकलण्याची प्रवृत्ती वाढत असल्यानेही समस्या वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. अनुराधा शेवाळे यांनी सांगितले, वर्ष २०२२ मध्ये नवीन कायदा लागू झाल्यानंतर सरोगसीचे प्रमाण घटले. पूर्वी ३० टक्के प्रकरणांमध्ये सरोगसीचा पर्याय निवडला जात होता. आता हे प्रमाण १ ते २ टक्क्यांवर आले. त्यामुळे ज्या महिलांना वैद्यकीय कारणांमुळे सरोगसीची खरोखर गरज आहे, त्यांच्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.’
आयव्हीएफमधून झालेल्या गर्भधारणेमध्ये जुळ्यांचे प्रमाण सुमारे ३० टक्के असते. अशा गर्भधारणांना विशेष काळजीची गरज असते. जुळ्या गर्भधारणांमध्ये प्री-टर्म डिलिव्हरी, गर्भपात, गर्भावस्थेतील मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका तुलनेने अधिक असतो. तरीही योग्य वैद्यकीय देखरेखीमुळे बहुतांश बालके निरोगी वाढतात, असे डॉ. अनुराधा शेवाळे यांनी सांगितले.
---
प्रत्येक वंध्यत्वासाठी आयव्हीएफच उपाय नाही
आज अनेक केंद्रांमध्ये रुग्णांना लवकर आयव्हीएफकडे वळवले जाते. मात्र, वजन नियंत्रण, पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज (पीसीओडी) व्यवस्थापन, जीवनशैलीतील बदल, औषधोपचार, आययूआयसारखे पर्याय उपलब्ध असताना त्यांचाही विचार करणे आवश्यक आहे. काही गंभीर प्रकरणांमध्ये आयव्हीएफ अपरिहार्य असले, तरी प्रत्येक रुग्णाची सखोल तपासणी, मूल्यांकन केल्यानंतरच हा निर्णय घ्यायला हवा. आयव्हीएफ उपचार अपयशी ठरल्यास तातडीने पुढील सायकल सुरू करण्याऐवजी अपयशाची कारणे शोधून त्यावर उपचार करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे डॉ. अनुराधा शेवाळे यांनी सांगितले.
----
पीसीओडी आणि जीवनशैली ही मोठी कारणे
कॉलेजवयीन मुलींमध्ये पीसीओडीचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याबद्दल डॉ. शेवाळे यांनी चिंता व्यक्त केली. फास्ट फूड, जंक फूड, पॅकेज्ड पदार्थ, शारीरिक हालचालींचा अभाव, अपुरी झोप आणि मोबाइल-सोशल मीडियाचा अतिवापर ही त्यामागील प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी सांगितले. नियमित व्यायाम, संतुलित आहार, वजन नियंत्रण आणि पुरेशी झोप यामुळे पीसीओडीसह पुढील काळातील वंध्यत्वाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतो, असेही त्या म्हणाल्या.
----
मातृत्वासाठी एग फ्रीजिंगचा पर्याय : डॉ. अपूर्वा शेवाळे
लग्नाचे वय आणि मातृत्व याविषयी बोलताना डॉ. अपूर्वा शेवाळे म्हणाल्या, ‘‘वय वाढल्यावर स्त्रीबीजांची गुणवत्ता कमी होत जाते. प्रत्येक स्त्रीची परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे एग फ्रीजिंगसारख्या तंत्रज्ञानाचा पर्याय महिलांसाठी उपलब्ध आहे. करिअर, शिक्षण किंवा इतर कारणांमुळे मातृत्व पुढे ढकलायचे असल्यास ३० वर्षांपूर्वी एग फ्रीजिंग किंवा एम्ब्रिओ फ्रीजिंग करून ठेवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. वयाच्या ३० ते ३२ वर्षांनंतर स्त्रीबीजांची संख्या आणि गुणवत्ता झपाट्याने कमी होऊ लागते. त्यामुळे तरुण वयात गोठवून ठेवलेले स्त्रीबीज किंवा गर्भ भविष्यात गर्भधारणेची संधी वाढवू शकतात. लग्न झालेल्या दांपत्यांना एम्ब्रिओ फ्रीजिंगचा पर्यायही उपलब्ध आहे. ते १० वर्षांपर्यंत सुरक्षित ठेवता येतात. भविष्यात ३५ ते ४० वर्षांच्या वयात गर्भधारणेचा विचार केल्यास नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणाऱ्या स्त्रीबीजांची गुणवत्ता कमी झालेली असू शकते. अशावेळी पूर्वी फ्रीज करून ठेवलेले स्त्रीबीज किंवा एम्ब्रिओ मोठा आधार ठरतात.
वंध्यत्वाच्या उपचारांमध्ये मानसिक आधार आणि योग्य समुपदेशन खूप महत्त्वाची भूमिका बजावते. अनेकदा उपचारांदरम्यान दांपत्यांना ताणतणाव आणि नैराश्याला सामोरे जावे लागते. अशा वेळी कुटुंबाचा पाठिंबा आणि डॉक्टरांचा सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्यासाठी दिलासादायक ठरतो. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान वेगाने प्रगती करत आहे, ज्यामुळे उपचारांचे यश वाढत आहे. मात्र, केवळ वैद्यकीय तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता दांपत्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे आणि आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. घरगुती आणि ताजे अन्न, दररोज चालण्याचा व्यायाम, ध्यानधारणा आणि मनःशांती यामुळे नैसर्गिक गर्भधारणेच्या शक्यता देखील खूप वाढू शकतात. भविष्यात वंध्यत्वाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी तरुण पिढीने आरोग्याबाबत अधिक जागरूक राहणे आणि वेळेवर योग्य वैद्यकीय सल्ला घेणे ही काळाची गरज बनली आहे.