महागाई वाढली; शेतमालाला अपेक्षित दर मिळेना
जळकोट, ता. १६ (बातमीदार) : दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्यांसह शेतकरीही आर्थिक अडचणीत सापडला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर, खते, बियाणे, औषधे, मजुरी तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असताना शेतमालाला मात्र अपेक्षित दर मिळत नसल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला असून, त्याचा परिणाम विविध वस्तूंच्या किमतींवर होत आहे. एलपीजी, सीएनजी तसेच विविध सेवा शुल्कांतील वाढीमुळे शेतीचा उत्पादन खर्चही वाढला आहे. बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, सिंचन, मशागत आणि मजुरीसाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागत आहे. दुसरीकडे द्राक्ष, केळी, कांदा, टोमॅटो, सोयाबीन, ऊस, हळद, आले, भुईमूग आणि भाजीपाल्यासारख्या पिकांना अनेकदा उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. वाढती महागाई, पाण्याची टंचाई आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती व्यवसाय अडचणीत आला आहे.
बाजारात ग्राहकांना भाजीपाला व धान्य महाग दराने खरेदी करावे लागत असले तरी त्याचा पुरेसा लाभ उत्पादक शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे. उत्पादक आणि ग्राहक यांच्यामधील व्यापारी व दलालांच्या साखळीमुळे शेतमालाच्या दरात मोठी तफावत निर्माण होत असल्याची नाराजी शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.