वाढत्या तापमानाचा भाजीपाल्याला फटका
------------
जवळा पांचाळच्या आठवडे बाजारात आवक घटली, दर काही प्रमाणात वाढले
----------
अविनाश उदगीरे
जवळा पांचाळ, ता. १८ (बातमीदार) ः परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आणि वाढत्या तापमानामुळे भाजीपाला पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. शेतातील भाजीपाला वाळून जात असल्याने नवीन मालाची आवक घटली आहे. याचा परिणाम जवळा पांचाळ येथील आठवडे बाजारात दिसून येत असून, भाजीपाल्याचे दर वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे.
भाजीपाल्याला चांगला भाव मिळेल, या आशेने अनेक शेतकरी भाजीपाला लागवड करीत आहेत. मात्र, वाढत्या तापमानामुळे आणि पाण्याच्या कमतरतेमुळे शेतातील पिके करपून जात आहेत. परिणामी, उत्पादनात घट होत असून बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. आवक घटल्याने बाजारातील दर वाढले आहेत.
पावसाने ओढ दिल्याने आणि तापमानात वाढ झाल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. एका बाजूला पिकांचे नुकसान होत असताना दुसऱ्या बाजूला उत्पादन खर्चही वाढत आहे. भाजीपाल्याला बाजारात चांगला भाव मिळण्याची अपेक्षा असली, तरी उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहण्याची शक्यता आहे. पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका शेतकरी आणि ग्राहक या दोघांनाही बसत आहे.
----
असे आहेत दर
सध्या भाजीपाल्याचे असलेले दर असे (किलो) ः कोथिंबीर १५० रुपये, पालक ८०, शेपू ६०, गवार शेंग ८०, शेवगा १२०, टोमॅटो ४०, हिरवी मिरची १००, कांदा ६०, लसूण १५०, बटाटा ३०, वांगी १००, तर काकडी ८० रुपये किलो.
----
((कोट))
पावसाअभावी आणि वाढत्या तापमानामुळे भाजीपाला पिके वाळून जात आहेत. बियाणे, खते, औषधे आणि पाण्यासाठी मोठा खर्च करावा लागत आहे. भाजीपाल्याला चांगला भाव मिळेल, या आशेने लागवड केली; मात्र पिकांचे नुकसान होत असल्याने अपेक्षित उत्पन्न मिळणे कठीण झाले आहे.
-गोविंद उदगीरे, भाजीपाला उत्पादक शेतकरी
----------
((कोट))
पावसाचे प्रमाण कमी असल्याने बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. मागणीच्या तुलनेत माल कमी येत असल्यामुळे दर वाढले आहेत. आवक कमी असल्याने खरेदी-विक्रीवरही परिणाम होत आहे. हवामानाने चांगली साथ दिल्यास भाजीपाल्याचे उत्पादन वाढून बाजारातील परिस्थिती सुधारू शकते.
-अमोल राऊत, भाजीपाला व्यापारी, जवळा पांचाळ