‘रास्ता रोको’ करणाऱ्यांवर
होणार कायदेशीर कारवाई
-----
लातूर, ता. १६ : विविध मागण्या शासन व प्रशासनाकडून मान्य करून घेण्यासाठी नागरिकांनी लोकशाही व कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा. मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करून सर्वसामान्य नागरिकांना त्रासाचे कारण बनू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी केले आहे. लातूर जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन केल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
विविध मागण्या मांडण्यासाठी काही व्यक्ती, संघटना किंवा आंदोलक रास्ता रोकोचा मार्ग स्वीकारतात. मात्र, सार्वजनिक रस्त्यांवरील वाहतूक अडवून नागरिकांची गैरसोय करणे हा मागण्या मांडण्याचा योग्य मार्ग नाही. लोकशाही व्यवस्थेत शासन व प्रशासनापर्यंत मागण्या पोहोचविण्यासाठी अनेक कायदेशीर व शांततामय मार्ग उपलब्ध आहेत. त्यांचा अवलंब करून मागण्यांसाठी पाठपुरावा करावा, असे तांबे यांनी सांगितले. रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाया जातो. कार्यालयीन कामकाज, शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा आणि दैनंदिन व्यवहारांवरही त्याचा परिणाम होतो. अनेक नागरिकांना नियोजित ठिकाणी वेळेवर पोहोचता येत नाही.
रास्ता रोकोमुळे रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने तसेच इतर आपत्कालीन सेवांच्या वाहनांना मार्ग मिळण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. गंभीर रुग्णांना रुग्णालयात पोहोचण्यास विलंब झाल्यास त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपत्कालीन सेवांना अडथळा निर्माण होणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.
नागरिकांनी रास्ता रोको आंदोलनाचा मार्ग न स्वीकारता आपल्या मागण्या लोकशाही व कायदेशीर मार्गाने मांडाव्यात. सार्वजनिक रस्त्यांवरील वाहतूक अडवून नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस अधीक्षक तांबे यांनी दिला.