रॅपिडो टॅक्सीसह १६ खासगी बसेसवर दंडात्मक कारवाई
विनापरवाना वाहतूक पडली महागात; आरटीओकडून दीड लाखांचा दंड वसूल
सकाळ वृत्तसेवा
बीड, ता. ३ : शहरात कोणत्याही अधिकृत परवान्याविना आणि नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या रॅपिडो बाईक टॅक्सी सेवेविरुद्ध उपप्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहरात विनापरवाना रॅपिडो टॅक्सी चालवणाऱ्या आणि प्रवाशांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांवर आरटीओने जोरदार कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील दोन दिवसांत दोन स्वतंत्र पथकांद्वारे राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत ६ विनापरवाना दुचाकींवर कारवाई करत तब्बल ७६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
जिल्ह्यासाठी रॅपिडो कंपनीने मोटार वाहन ॲग्रिगेटर नियम, २०२६ नुसार कोणताही वैध परवाना प्राप्त केलेला नाही. तरीही थोडेफार आर्थिक फायदे मिळवण्याच्या आमिषाला बळी पडून अनेक मालक आपली खासगी वाहने या ॲपवर जोडून प्रवासी वाहतूक करत आहेत. अशा अवैध सेवेमध्ये चालकाची पोलिस पडताळणी, वैध विमा संरक्षण किंवा प्रवाशांच्या तक्रार निवारणाची कोणतीही यंत्रणा नसते. त्यामुळे मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम १९२ (अ) नुसार अशा विनापरवाना वाहनांवर पहिल्याच गुन्ह्यात १० हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. आरटीओच्या या धडक कारवाईमुळे अवैध टॅक्सी चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
----
दिवाळीत प्रवाशांची लूट करणाऱ्या १६ बसेसवर कारवाई
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खासगी बसचालकांकडून प्रवाशांची आर्थिक लूट केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार आरटीओने केलेल्या तपासणीत फिटनेस मुदत संपलेल्या, कागदपत्रे अपूर्ण असलेल्या आणि अग्निरोधक यंत्रणा नसलेल्या १६ खासगी बसेसवर कारवाई करत ७० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी शहरात दोन स्वतंत्र पथकांद्वारे ही तपासणी मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
-----
कोट
बीड शहरात अवैध प्रवासी वाहतुकीवर आळा घालण्यासाठी आरटीओची दोन पथके नेमण्यात आली असून, ही तपासणी मोहीम पुढील काळातही अत्यंत कडकपणे सुरू राहील. नागरिकांनी सुरक्षित प्रवासासाठी विनापरवाना ॲप्सचा वापर टाळावा आणि वाहन मालकांनी आपली खासगी वाहने व्यावसायिक प्रवासासाठी देऊ नयेत. तुमची दुचाकी, तुमची जबाबदारी.
- सुरेश आव्हाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बीड.