(दीपोत्सव लेख)
मातीचा सुगंध हरवतोय; दिवाळीचा रंग बदलतोय
---
शहरांमधील चकचकाट, रोषणाई आणि आधुनिकतेचा स्पर्श दिवाळीला वेगळाच रंग देतो. मात्र, खरी दिवाळी अनुभवायची असेल, तर ती ग्रामीण भागातच अनुभवायला मिळते. मातीचा सुगंध, शेतातील पिकांची हिरवळ, चुलीवर तयार होणाऱ्या नैवेद्याचा दरवळ आणि आपुलकीच्या नात्यांची वीण, हे ग्रामीण दिवाळीचे खरे वैशिष्ट्य आहे. मात्र, काळ बदलत आहे. जागतिकीकरण, तंत्रज्ञान, दळणवळणाची साधने आणि शहरी संस्कृतीचा वाढता प्रभाव यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन वेगाने बदलत आहे.
- सुभाष बिडे, घनसावंगी
----
पूर्वी ग्रामीण भागात दिवाळीच्या काही दिवस आधीपासूनच घरांची दुरुस्ती आणि रंगरंगोटी सुरू होत असे. मातीची घरे असण्याच्या काळात महिला शेणाने आणि मातीने घरे सारवून स्वच्छ करत असत. भिंतींवर पांढऱ्या मातीने किंवा चुन्याने तसेच तांबड्या गेरूने नक्षीकाम केले जात असे. या कामात एक वेगळाच सामुदायिक आनंद असे. अंगणात रांगोळी काढण्यासाठी तांदळाचे पीठ किंवा पांढऱ्या दगडाची पूड वापरली जात असे. दिवाळीच्या दिवसांत चुली स्वच्छ करून त्यांनाही रंगरंगोटी केली जात असे. आज ग्रामीण भागातही सिमेंट आणि विटांच्या पक्क्या घरांचे प्रमाण वेगाने वाढले आहे. मातीची घरे आता विरळ होत चालली आहेत. शेणाने सारवण्याची जागा सिमेंटच्या फरशा आणि टाइल्सनी घेतली आहे. घरांच्या भिंतींना मातीच्या रंगांऐवजी आधुनिक रंगांचा वापर केला जातो. रांगोळीसाठी नैसर्गिक रंगांऐवजी बाजारात मिळणाऱ्या तयार रंगांचा, साच्यांचा आणि आकर्षक चिकटवलेल्या सजावटींचा वापर वाढला आहे. अंगणात शेणाने सारवलेल्या जमिनीऐवजी पेव्हर ब्लॉक किंवा सिमेंटचे कट्टे दिसू लागले आहेत. पारंपरिक पद्धतीने रांगोळी काढण्याऐवजी तयार साचे आणि स्टिकर्स वापरण्याचे प्रमाणही वाढले आहे. दिवाळीत फराळाला सर्वाधिक महत्त्व असते. पूर्वी ग्रामीण भागातील फराळ पूर्णपणे घरगुती, शुद्ध आणि आरोग्यदायी असायचा. घरात काढलेले लोणी आणि त्यापासून बनवलेले साजूक तूप फराळासाठी वापरले जात असे. कडक उन्हात वाळवलेले पोहे, तांदळाच्या कुरडया, सांडगे, चकल्या, लाडू आणि शेव असे विविध पदार्थ महिला एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने तयार करत असत. एकाच गल्लीतील महिला एकत्र जमून फराळ बनवत. या प्रक्रियेत केवळ पदार्थांचीनिर्मिती होत नसे, तर गप्पा, संवाद आणि आपुलकीची देवाणघेवाणही होत असे. आजच्या बदलत्या जीवनशैलीत धावपळीचे युग आले आहे. महिला नोकरी, शेती आणि व्यवसायात व्यस्त असल्यामुळे घरी फराळ बनविण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे बाजारातून तयार फराळ किंवा पाकीटबंद पदार्थ विकत आणण्याकडे कल वाढला आहे. यामुळे एकत्र येऊन फराळ बनविण्याचा आनंद आणि त्यातून निर्माण होणारा जिव्हाळा काहीसा कमी झाला आहे. पारंपरिक पदार्थांच्या जोडीला तयार खाद्यपदार्थ, नूडल्स, पिझ्झा आणि बर्गर यांचे आकर्षणही वाढले आहे. पदार्थांची चव टिकवून ठेवण्याचा प्रयत्न होत असला, तरी त्यामागील श्रम, सामूहिक सहभाग आणि आत्मीयता हरवत चालली आहे. एकेकाळी ग्रामीण भागातील रोषणाईचे स्वरूप अत्यंत साधे आणि निसर्गाच्या जवळ जाणारे होते. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात मातीच्या पणत्या लावून तेल आणि वातीच्या साह्याने रोषणाई केली जात असे. गावोगावचे कुंभार महिनाभर आधीपासून पणत्या बनविण्याच्या कामाला लागत असत. रात्रीच्या अंधारात लुकलुकणाऱ्या पणत्यांचा प्रकाश मनाला एक वेगळीच शांतता देत असे. पूर्वी फटाक्यांचे प्रमाणही मर्यादित होते. लवंगी फटाके, भुईचक्र, सुरसुरी आणि फुसफुसे यांसारखे साधे फटाके मुले आनंदाने फोडत असत. आज ग्रामीण भागातील रोषणाईत आमूलाग्र बदल झाला आहे. मातीच्या पणत्यांची जागा एलईडी दिवे, विद्युत रोषणाईच्या माळा आणि रंगीबेरंगी दिव्यांनी घेतली आहे. वीजपुरवठा सुधारल्यामुळे संपूर्ण गाव रोषणाईने उजळून निघते. मात्र, मातीच्या पणत्यांमधून मिळणारा नैसर्गिक प्रकाश आणि त्यातील जिव्हाळा काहीसा कमी झाला आहे.
फटाक्यांच्या बाबतीतही मोठा बदल झाला आहे. साध्या फटाक्यांऐवजी कानठळ्या बसविणारे आणि मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणारे आवाजाचे फटाके, हजारो फटाक्यांच्या माळा आणि आकाशात रोषणाई करणारे फटाके ग्रामीण तरुणांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. त्यामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा प्रश्न ग्रामीण भागातही गंभीर बनत चालला आहे. दरम्यान, गावातील लोककलेचे कार्यक्रम आणि पारंपरिक खेळांवर प्रशासकीय नियम तसेच आधुनिक मनोरंजनाचा प्रभाव पडल्याने त्यांचे स्वरूप बदलले आहे. मनोरंजनासाठी आता दूरचित्रवाणी, ध्वनिक्षेपक आणि स्मार्टफोनला अधिक पसंती दिली जात आहे. दिवाळीनिमित्ताने नवीन कपडे खरेदी करणे हा प्रत्येक लहान-मोठ्यासाठी आनंदाचा क्षण असतो. पूर्वी ग्रामीण भागात दिवाळीसाठी पुरुष सदरा-पायजामा किंवा शर्ट-पँट, तर महिला नऊवारी अथवा सुती साड्या खरेदी करत असत. यासाठी वर्षातून एकदा होणाऱ्या आठवडे बाजारावर किंवा तालुक्याच्या ठिकाणी होणाऱ्या खरेदीवर भिस्त असे. आज ग्रामीण भागातील दळणवळण सुधारल्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी आणि मोठ्या गावांमध्येही मोठी वस्त्रदालने आणि नामांकित कंपन्यांची दुकाने उपलब्ध झाली आहेत. तरुणवर्ग जीन्स, टी-शर्ट आणि जॅकेट्स यांसारख्या आधुनिक पेहरावाला पसंती देत आहे. फॅशनबाबतीत ग्रामीण आणि शहरी भागांतील अंतर कमी झाले आहे. इंटरनेटवरील लघुचित्रफिती आणि प्रभावशाली व्यक्तींचे अनुकरण करून ग्रामीण तरुणाईही शहरी फॅशनचे नवे प्रवाह वेगाने आत्मसात करत आहे. आजच्या बदलत्या काळात शेतीचे स्वरूपही बदलले आहे. रासायनिक शेती, पाण्याचा तुटवडा, हवामानातील अनिश्चितता आणि शेतीवरील वाढता खर्च यामुळे शेतीतून पूर्वीप्रमाणे हमखास उत्पन्न मिळत नाही. परिणामी, ग्रामीण भागातील तरुणांचा शिक्षण आणि नोकरीसाठी शहरांकडे जाण्याचा कल वाढला आहे. त्यामुळे शेतातून घरात येणाऱ्या धान्याची जागा बाजारातील पाकीटबंद वस्तूंनी घेतली आहे. शेती आणि पशुधनाशी असलेले थेट भावनिक नातेही काहीसे कमी होत चालले आहे. शेतीच्या कामात बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतल्यामुळे काही ठिकाणी पाडव्याच्या पारंपरिक स्वरूपातही बदल झाला आहे. तरीही अनेक कुटुंबांकडून या परंपरा जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. बदलाच्या या प्रवासात केवळ नकारात्मक बाबीच आहेत असे नाही, काही सकारात्मक बदलही पाहायला मिळतात. ग्रामीण भागात आरोग्याविषयी आणि सुरक्षित दिवाळी साजरी करण्याबाबत जागरूकता वाढली आहे. विशेषतः फटाके फोडताना घ्यावयाची काळजी, पर्यावरणाचे संरक्षण आणि स्वच्छतेविषयी नागरिक अधिक सजग होत आहेत. महिला बचत गटांच्या माध्यमातून घरगुती फराळ तयार करून त्याची व्यावसायिक विक्री करू लागल्या आहेत. यामुळे महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होत असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळ मिळत आहे. शहरांमधील यांत्रिक जीवनशैलीपासून दूर असलेल्या ग्रामीण भागात आजही मातीची ओढ, माणसांमधील आपुलकी आणि सणाचा अस्सल आनंद काही प्रमाणात टिकून आहे. गरज आहे ती आधुनिकतेचा स्वीकार करताना आपल्या समृद्ध परंपरा जिवंत ठेवण्याची. येणाऱ्या काळातही ग्रामीण भागातील दिवाळीचा हा दीपोत्सव असाच तेवत राहो आणि माणसांमधील दुरावा कमी करून जिव्हाळा वाढवत राहो, हीच या सणामागील खरी अपेक्षा आहे.