ग्रामीणसाठी स्वतंत्र अग्निशमन धोरण
मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद; करंडे कुटुंबाला भरीव मदतीची मागणी
धाराशिव, ता. १४ (बातमीदार) : येडशी येथील भीषण आगीत करंडे कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने ग्रामीण भागातील अग्निशमन यंत्रणेतील त्रुटी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामीण महाराष्ट्रासाठी स्वतंत्र, सक्षम आणि तातडीने प्रतिसाद देणारी अग्निशमन यंत्रणा उभारण्यासह स्वतंत्र धोरण तयार करण्याच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
येडशी येथे सोमवारी (ता. नऊ) पहाटे करंडे कुटुंबाच्या दुकानाला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच आमदार पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरवातीला धाराशिवहून एकच अग्निशमन बंब उपलब्ध झाला. आगीची तीव्रता लक्षात घेऊन तुळजापूर आणि कळंब येथून अतिरिक्त अग्निशमन वाहने मागविण्यात आली. मात्र, ही वाहने पोहोचेपर्यंत उशीर झाला होता. ग्रामीण भागात स्वतंत्र अग्निशमन केंद्रे नसल्याने आग लागल्यानंतर २५ ते ५० किलोमीटर अंतरावरून वाहने बोलवावी लागतात. त्यामुळे मदत पोहोचण्यास विलंब होतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी ग्रामीण व दुर्गम भागांतील अग्निशमन सुविधांचे राज्यव्यापी सर्वेक्षण करून स्वतंत्र धोरण तयार करावे, अशी मागणी आमदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
तालुकास्तरावर सुसज्ज अग्निशमन केंद्रे, आधुनिक वाहने, प्रशिक्षित कर्मचारी, तातडीच्या प्रतिसादाची यंत्रणा आणि आवश्यक पाणीसाठ्याची व्यवस्था करावी. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात ग्रामीण अग्निशमनासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करावी. तसेच प्रलंबित वाहन प्रस्तावांवर कालमर्यादेत निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
आगीत सहा सदस्य गमावलेल्या करंडे कुटुंबाच्या वारसांना विशेष बाब म्हणून भरीव आर्थिक मदत द्यावी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक सहकार्य करावे, अशी मागणीही आमदार पाटील यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर सकारात्मक शेरा देत संबंधित यंत्रणेला मदतीच्या सूचना दिल्या आहेत.