ABD26J82433
जयपूर (ता. सेनगाव) ः येथील जिल्हा परिषद प्रशालेत ‘सुरक्षित बालपण अभियान’ राबविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षक.
---------------
४१५ विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे
---
जयपूरच्या जिल्हा परिषद शाळेत ‘सुरक्षित बालपण अभियान’ उत्साहात
--------------------
सेनगाव, ता. ३१ (बातमीदार) : बालकांचे हक्क, त्यांचे संरक्षण आणि डिजिटल युगातील सुरक्षिततेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने तालुका विधी सेवा समितीच्या वतीने जयपूर (ता. सेनगाव) जिल्हा परिषद प्रशालेत ‘सुरक्षित बालपण अभियान’ राबविण्यात आले. या उपक्रमात ४१५ विद्यार्थी आणि १२ शिक्षकांनी सहभाग घेतला होता. यावेळी तज्ज्ञांनी बालकांचे हक्क, बालविवाह प्रतिबंधक कायदे, बालशोषणापासून संरक्षण आणि सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.
हिंगोली येथील चाइल्ड हेल्पलाइनचे जिल्हा प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे यांनी बालकांचे मूलभूत हक्क, संरक्षण तसेच अडचणीच्या प्रसंगी उपलब्ध असलेल्या मदत व तक्रार निवारण यंत्रणेची माहिती दिली. पॅनल विधिज्ञ ॲड. एम.पी. कांबळे यांनी बालकांशी संबंधित विविध कायदेशीर तरतुदी सोप्या भाषेत समजावून सांगितल्या. सेनगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष तथा पॅनल विधिज्ञ ॲड. सी. व्ही. झुंगरे यांनी बालविवाह आणि बालशोषण प्रतिबंधक कायद्यांविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना कायदेशीर हक्कांची जाणीव करून देतानाच बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात स्वतःची सुरक्षितता कशी जपावी, याचेही व्यावहारिक मार्गदर्शन या अभियानातून मिळाले.
कार्यक्रमाला विधिज्ञ श्रीराम पायघन, शालेय समितीचे अध्यक्ष पायघन, न्यायालयीन कर्मचारी जे.एन. मद्दे, आय.यू. राठोड, मुख्याध्यापक डी. एस. शेटे यांची उपस्थिती होती. मुख्याध्यापक डी. एस. शेटे यांनी प्रास्ताविक केले. शिक्षक एस. टी. बोंडे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
----
विद्यार्थ्यांना सावधगिरीचा संदेश
मोबाइल आणि इंटरनेटच्या वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर ‘सुरक्षित क्लिक, सुरक्षित बालपण’ ही संकल्पना मांडण्यात आली. सेनगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव यांनी वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवणे, अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, ऑनलाइन फसवणूक टाळणे आणि इंटरनेटचा सुरक्षित वापर याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.