साई सृष्टी पार्कमध्ये घरफोडी,
साडेपाच लाखांचे दागिने चोरी
--
पैठण रोड, ता. ५ : कुटुंबीय दुसऱ्या घराकडे गेले असता तीन चोरांनी ५ लाख ४१ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे १२ दागिने लंपास केल्याची घटना साई सृष्टी पार्क सोसायटीत घडली. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
स्नेहा सुधीर बोरगावकर (वय ४५) या २१ ऑगस्टला त्यांच्या समर्थनगर येथील दुसऱ्या घरी गेल्या होत्या. शेजाऱ्यांनी रविवारी (ता. चार ऑक्टोबर) स्नेहा यांना फोन करून कळवले की घर उघड आहे. स्नेहा यांनी साई सृष्टी पार्क येथे धाव घेतली. तिथे सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. सीसीटीव्ही चेक केले असता सकाळी ४.४५ ते ५.३० या अवघ्या पाऊण तासाच्या कालावधीत तीन चोरांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटाचे लॉकर फोडून दोन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र, दीड तोळ्याची मोत्याची माळ, सोन्याच्या अंगठ्या, तीन तोळ्यांचा नानू सेट, सोन्याच्या बांगड्या आणि दोन किलो वजनाचे चांदीचे भांडे असा एकूण पाच लाख ४१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन ठसे गोळा केले आहेत.