लातूर ः सलगरा येथे विविध विकास कामाचे लोकार्पण झाले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड, माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड, विश्वजित गायकवाड, अश्वजित गायकवाड आदी.
कर्तृत्वाला सामाजिक बांधिलकीची जोड गरजेची
-------
जिल्हाधिकारी बास्टेवाड : डॉ. अनिलकुमार गायकवाडांच्या कामाचे कौतुक
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. ९ ः आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्तृत्वाचा ठसा उमटवतानाच आपल्या मातीशी आणि नात्यांशी असलेली नाळ घट्ट जपणारे राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा ‘इंटरनॅशनल रोड फेडरेशन’चे अध्यक्ष डॉ. अनिलकुमार गायकवाड यांनी सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श निर्माण केला आहे. कर्तृत्वाला सामाजिक बांधिलकी जोड देत त्यांनी सुरु केलेले काम कौतुकास्पद आहे, असे मत जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी व्यक्त केले.
सलगरा येथे देविदास गुरधाळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ डॉ. गायकवाड यांनी पुढाकार घेत गणपती विसर्जन घाट, अस्थी विसर्जन घाट, धोबीघाट, शिवमंदिर, सभागृह, उद्यान अशा विविध विकासकामांची उभारणी केली आहे. या विकास कामाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ८२ रोपांची लागवड करण्यात आली.
डॉ. गायकवाड यांच्या आंतरराष्ट्रीय कर्तृत्वाच्या तुलनेत हे कार्य खूपच लहान आहे. त्यांच्यासारख्या कर्तृत्ववान भूमिपुत्राच्या क्षमतेचा उपयोग करून घेण्यासाठी समाजाने त्यांच्यासमोर आणखी मोठ्या विकास संकल्पना मांडल्या पाहिजेत. आपल्या माणसांसाठी धावून येणारा असा माणूस मिळणे ही कौतुकास्पद बाब आहे, असे डॉ. बास्टेवाड म्हणाले.
माणूस पदाने किंवा पैशाने कितीही मोठा झाला, तरी त्याने आपली माणसे आणि नाती विसरता कामा नयेत. खरी श्रीमंती पदात नसून नात्यांमध्ये आणि समाजाप्रती असलेल्या कर्तव्यात असते. देविदास गुरधाळे यांच्या विचारांचा सन्मान करणे हे माझे कर्तव्य आहे, असे डॉ. गायकवाड म्हणाले. याप्रसंगी माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड, गिरीश प्रभुणे, जयश्री गायकवाड, प्रियंका गायकवाड, अभिजीत गायकवाड, विश्वजित गायकवाड, सरपंच शांता साळुंके, महादेव साळुंके, अनुरुथ गव्हाडे, सेवांकूडचे अध्यक्ष अश्वजित गायकवाड उपस्थित होते. सूत्रसंचालन दीपरत्न निलंगेकर यांनी केले.
-------------