Sambhaji nagar : EDतपासणार अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांचे कॉल रेकॉर्डिंग Sambhaji nagar ED investigate call recording contractors officials | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ED raids

Sambhaji nagar : EDतपासणार अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांचे कॉल रेकॉर्डिंग

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या वतीने शहरात राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या निविदेत तथाकथित घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या पथकाने शुक्रवारी (ता.१७) शहरात ३ ठिकाणी छापेमारी केली. दरम्यान, तत्कालीन मनपा आयुक्तांसह इतर अधिकारी आणि कंत्राटदारांचे कॉल रेकॉर्डिंग ईडीचे अधिकारी तपासणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे तत्कालीन मनपा आयुक्तांसह इतर अनेक अधिकारी संशयाच्या फेऱ्यात सापडले आहेत.

शुक्रवारी ईडीच्या १५ अधिकाऱ्यांनी शहरात सकाळी सातपासून कारवाईची मोहीम हाती घेतली होती. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी पानदरिबा, अहिंसानगर, उल्कानगरी, समर्थनगर, नारळीबाग, कासारी बाजार, नाजगल्ली, कॅनॉट परिसर या भागात छापेमारी केली.

तसेच त्यापूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी मनपाकडून संबंधित कागदपत्रे अगोदरच मागवून घेतली होती. दरम्यान, शुक्रवारी दिवसभर कारवाई केल्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ईडीचे अधिकारी मनपा मुख्यालयात दाखल झाले.

त्यांनी मनपा आयुक्त डॉ.अभिजित चौधरी, उपायुक्त अपर्णा थिटे, रवींद्र निकम आदी अधिकाऱ्यांकडून पंतप्रधान आवास योजनेचे निविदा प्रक्रिया कशी राबवली गेली याची माहिती घेतली. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी तत्कालीन मनपा आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांचे फोन कॉल रेकॉर्डिंग तपासण्यासाठी संबंधित मोबाइल कंपन्यांकडून माहिती घेण्यास सुरवात केली आहे.