
Sambhaji nagar : लासूर स्टेशनला अतिक्रमणांवर हातोडा
लासूर स्टेशन : लासूर स्टेशन (ता.गंगापूर) येथील नागपूर-मुंबई महामार्ग तसेच सावंगी चौक ते रेल्वे फाटकादरम्यान दोन्ही बाजूच्या अतिक्रमणांवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, बांधकाम विभाग, पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह शनिवारी (ता.११) जेसीबी फिरविण्यात आला.
यामुळे या रस्त्याने मोकळा श्वास घेतला. या कारवाई त नागरिकांची घरे, दुकाने उद्ध्वस्त झाल्याने व्यापारी, महिला, मुलांनी टाहो फोडला होता.
लासूर स्टेशन येथे नागपूर-मुंबई महामार्गावरील सावंगी चौकापासून चारही दिशांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्याने येथे सातत्याने वाहतुकीची कोंडी होत होती. या रस्त्यावरून मार्ग काढताना अपघातात अनेक दुचाकिस्वारांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या होत्या.
त्यामुळे येथील अतिक्रमणे काढण्याची मागणी करण्यात येत होती. येथील नागपूर महामार्ग, सावंगी चौक ते रेल्वेफाटका दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण धारकांना नोटिसा बजावून अतिक्रमण काढण्याची सूचना केली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता.१०) सायंकाळी काहींनी स्वतःहून अतिक्रमण काढली.
शनिवारी (ता.११) सकाळी आठच्या दरम्यान मात्र, संबंधित विभागाचे अधिकारी मोठ्या पोलिस बंदोबस्तात पाच जेसीबी यंत्र, कामगारांना घेऊन घटनास्थळी आले. या अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पंधरा मिटर असे मोजमाप करत अतिक्रमणांवर कारवाई केली. पोलिसांचा मोठा फौजफाटा असताना काहींनी कारवाईला विरोध केला. मात्र, त्या विरोधाला न जुमानता अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
यावेळी घरे तसेच दुकानांवर कारवाई झाल्याने व्यापारी, महिला, मुलांना हंबरडा फोडल्याचे दिसून आले. ही कारवाई दिवसभर सुरु होती. दरम्यान, सावंगी चौक ते रेल्वे फाटक, नागपूर मुंबई महामार्गांवर वैजापूर व छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा रस्ता, गंगापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरीलही अतिक्रमणे हटविली. अतिक्रमण हटविल्यानंतर सर्वत्र भिंतीचा मलबा, धूळ, शेडच्या पत्रांचा ढीग साचला होता.
उद्ध्वस्त वातावरण असताना रस्त्याने मात्र मोकळा श्वास घेतल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, आमच्याकडे खरेदीखत, ग्रामपंचायतीचा नमुना आठ आदी कागदपत्रे असतानाही ही कारवाई झाली, असा आरोप काही नागरिकांनी केला तर यानंतर गावातील रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणे पण काढा अन्यथा आंदोलन करू असा पवित्राही काहींनी घेतला आहे.
यावेळी तहसीलदार सतीश सोनी, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले, पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, मंडळ अधिकारी गणेश कुलकर्णी, पोलिस पथक, महसूल विभाग, बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.
दिवसभर सुरु होती कारवाई
लासूर स्टेशन येथील कारवाईत अनेकांची दुकाने, घरे, काहींची पक्की बांधकामे, दुकानासमोरील पत्र्यांचे शेड, पायऱ्या, ओटे, टपऱ्या तब्बल पाच जेसीबी यंत्राच्या सहाय्याने हटवण्यात आले. दरम्यान शनिवारी (ता.११) सकाळपासून दिवसभर ही कारवाई सुरु होती. येथील अतिक्रमण धारकांच्या चेहऱ्यावर प्रचंड तणाव दिसून आला. मात्र, रस्ता मोकळा झाल्याने अनेकजण समाधानही व्यक्त केले.