Sambhaji nagar : महापालिका काढणार आदेश ; एसटीपीचे पाणी बांधकामासाठी योग्य Sambhaji nagar Municipal Corporation issue order STP water suitable construction | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhatrapati Sambhaji Nagar

Sambhaji nagar : महापालिका काढणार आदेश ; एसटीपीचे पाणी बांधकामासाठी योग्य

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या एसटीपी प्लांटमधून बाहेर पडणारे पाणी वाया जात आहे. या पाण्याचा वापर व्हावा, यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात एसटीपीचे पाणी बांधकामासाठी योग्य असल्याचे शासकीय प्रयोगशाळेने महापालिकेला कळवले आहे, त्यामुळे महापालिका आता बांधकामासाठी एसटीपीचे पाणी बंधनकारक करणार आहे. यासंदर्भात लवकरच आदेश निघण्याची शक्यता आहे.

महापालिकेने केंद्र शासनाच्या अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट स्कीम फॉर स्मॉल अँड मीडियम टाउन्स (यूआयडीएसएसएमटी) या योजनेअंतर्गत शहरात कांचनवाडी, झाल्टा फाटा, पडेगाव याठिकाणी मलजल प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारले आहेत. यातील झाल्टा फाटा येथील एसटीपीचे पाणी परिसरातील शेतकऱ्यांना दिले जाते तर इतर एसटीपीचे पाणी वाया जाते.

कांचनवाडी येथील एसटीपी क्षमता रोज १६५ दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करण्याची आहे. सध्या या ठिकाणी ६५ दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया होते. हे पाणी नाल्यात सोडून दिले जाते. एसटीपीच्या पाण्यावर पुनर्प्रक्रिया करण्यासाठी व हे पाणी उद्योजकांनी वापरावे यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत.

यासंदर्भात शासनाने देखील आदेश काढले; पण त्याचा उपयोग झाला नाही. मध्यंतरीच्या काळात समृद्धी महामार्गाच्या कामासाठी एसटीपीच्या पाण्याचा वापर झाला; पण त्यानंतर महापालिकेच्या पाण्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे एसटीपीचे पाणी शहरात होणाऱ्या बांधकामासाठी वापरण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी प्रयोगशाळेचा अहवाल मागविण्याचे ठरवण्यात आले.

एसटीपीचे प्रक्रिया केलेले पाणी बांधकामासाठी योग्य आहे का? हे तपासण्यासाठी या पाण्याचे नमुने मुंबई येथील शासकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. या प्रयोगशाळेचा अहवाल महापालिका प्रशासनाने नुकताच प्राप्त झाला. एसटीपीचे प्रक्रिया केलेले पाणी बांधकामासाठी वापरण्यास योग्य असल्याचा अभिप्राय प्रयोगशाळेने दिला आहे. त्यानुसार लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.

एसटीपीचे पाणी बांधकामासाठी वापरण्यास योग्य असल्याचा शासकीय प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाला आहे. एसटीपीचे पाणी बांधकामासाठी वापरता येईल असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार महापालिका प्रशासन निर्णय घेणार आहे. महिनाभरात आदेश निघू शकतात.

- ए.बी. देशमुख, शहर अभियंता, महापालिका