sambhaji nagar : छत्रपती संभाजीनगर घटनेनंतर रामजन्मोत्सव उत्साहात, मुस्लिम बांधवही रथयात्रेत सहभागी Sambhaji Nagar Ram Janmat festival Muslim brothers also participate Rath Yatra. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 रामजन्मोत्सव साजरा

Sambhaji nagar : छत्रपती संभाजीनगर घटनेनंतर रामजन्मोत्सव उत्साहात, मुस्लिम बांधवही रथयात्रेत सहभागी

छत्रपती संभाजीनगर : शहरात किराडपुरा भागातील जाळपोळीच्या घटनेनंतर सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने गुरुवारी (ता. तीस) रामनवमी महोत्सव निर्विघ्न पार पडला. राममंदिराला दिवसभरात केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकारमंत्री अतुल सावे, पालकमंत्री संदीपान भुमरे, खासदार इम्तियाज जलील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार प्रदीप जैस्वाल, शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भेटी देत सर्वांनीच शांततेचे आवाहन केले.

दर्शनासाठी सुरू झाली रीघ

गुरुवारी सकाळीच नेहमीप्रमाणे नागरिक घराबाहेर पडले तेव्हा झालेल्या घटनेची माहिती मिळाल्यावर प्रत्येकाचे चेहरे चिंताजनक दिसत होते. काय झाले, कसे झाले, दंगल करणारे कोण होते हेच प्रश्न नागरिकांना सतावत होते. राममंदिर आणि परिसरात चौकाचौकात आणि रस्त्यावर तरुण, वृद्ध आणि नागरिकांची चर्चा सुरू होती.

रथयात्रा उत्साहात

राममंदिरात दुपारी बारा वाजता रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर पाच वाजता रथयात्रा काढण्यात आली. राममंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मानसिंग पवार, उपाध्यक्ष सुधीर विद्धंस, सरचिटणीस दयाराम बसैय्ये, उत्तमराव मनसुटे, विजय शिंदे, भास्करराव बेलसरे आदींच्या उपस्थितीत रथयात्रेला सुरुवात झाली. यावेळी हाजी इसाक खान यांच्यासह मुस्लिम समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते. आमच्या वाडवडिलांपासून म्हणजे दोन पिढ्यांपासून राममंदिरातील सोहळ्यात आम्हीही सहभागी होतो.

समाजकंटकांनी वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला. त्याच्याशी समाजाचा संबंध नाही. आम्ही सर्व हिंदू बांधवांच्या सोबत आहोत, अशा भावना यावेळी हाजी इसाक खान यांनी व्यक्त केल्या. यावेळी विशेष म्हणजे मुस्लिम बांधवांतर्फे मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी दहा वर्षांपासून सरबताची व्यवस्था करण्यात येते ती यंदाही करण्यात आली होती. यावेळी हाजी इसाक खान, इब्राहिम पटेल, शारेक नक्शबंदी, सय्यद तौफीक यांची उपस्थिती होती. ही रथयात्रा राममंदिर, आझाद चौक, आविष्कार चौक व परत राममंदिर अशी काढण्यात आली. रस्त्यात ठिकठिकाणी भाविक दर्शन घेत होते.

हळूहळू वाढली राममंदिरात भाविकांची गर्दी

सकाळी आठनंतर एक-एक करत महिला-पुरुष दर्शनासाठी राममंदिरात येऊ लागले. त्यानंतर वातावरण निवळले. हळूहळू भीती कमी होऊन गर्दी वाढत गेली, नंतर महिला आणि कुटुंबही दर्शनासाठी येताना दिसत होते. मंदिराच्या परिसरात बुंदीचा प्रसाद वाटप करण्यात आला. परिसरात मधुकर बोरसे महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

साडेनऊला कीर्तनाला सुरुवात झाल्याने वातावरण भक्तिमय झाले होते. मात्र, दुपारी बाराच्या सुमारास काही तरुणांचे जत्थे रॅलीसह घोषणाबाजी करीत मंदिराच्या दिशेने येत होते, त्यामुळे पोलिसांनी या तरुणांना आझाद चौकात रोखून वाहनांशिवाय पायी मंदिराच्या दिशेने पाठवले. दिवसभरात पोलिसांनी दोन ते तीन वेळा आझाद चौकातून मंदिराच्या दिशेने जाणारा रस्ता खबरदारी म्हणून काही वेळासाठी बंद केला होता.