
Sambhaji nagar : ट्रॅक्टरची चोरी करणाऱ्यास ठोकल्या बेड्या
वैजापूर : तालुक्यातील पालखेड येथून घरा समोर उभा असलेला ट्रॅक्टर ट्रॉली लांबविणाऱ्या एका आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने पाच दिवसात बेड्या ठोकल्या आहे. या आरोपीला पोलिसांनी गुरुवारी (ता.९) चितेपिंपळगाव परिसरातून अटक करत ट्रॅक्टर ट्रॉली जप्त केली.
गणेश भगवान मुलमुले (वय ३३, रा.पालखेड,वैजापूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तालुक्यातील पालखेड येथील मधुकर काशिनाथ वाणी हे शेतात वस्तीवर राहतात. त्यांच्या घरासमोर उभे असलेला ट्रॅक्टर चोरट्यांनी लांबविल्याची घटना शनिवारी पहाटे उघड झाली. त्यामुळे त्यांनी वैजापूर पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, आरोपीने आपल्या दोन साथीदाराच्या मदतीने ट्रॅक्टर ट्रॉली चोरुन कंडारी जि. जालना येथे त्याचे नातेवाइकांकडे नेऊन महिनाभर वापरा असे सांगितले होते. पोलिसांनी ट्रॅक्टर ट्रॉली जप्त केली आहे. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, सहा.पोलिस अधीक्षक महक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोउपनि. प्रदीप डूबे, पोहे. संजय घुगे, पोना. अशोक वाघ, शेख अख्तर, पोकॉ.राहुल गायकवाड, ज्ञानेश्वर मेटे यांनी कारवाई केली आहे.