महापालिकेतील निधीवाटपाची
चौकशी करा ः समीर बिल्डर
---
छत्रपती संभाजीनगर, ता. १७ : महापालिकेतील विकासकामांचे निधीवाटप, बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांच्या एजन्सींना झालेली कथित २२ कोटी रुपयांची अतिरिक्त उधळण आणि २०२६-२७ च्या अर्थसंकल्पातील आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर यांनी केली.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त शहरात आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट घेऊन निवेदन दिले. एमआयएमच्या नगरसेवकांच्या प्रभागांवर निधीवाटपात अन्याय होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. पक्षभेद न करता सर्व प्रभागांना समान विकासनिधी द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. शिवाय गॅस आणि पाणीपुरवठ्यासाठी खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करावी आणि विमानतळ ते पडेगाव-मिटमिटा रस्ता रुंदीकरणाची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत, असेही निवेदनात नमूद केले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील गरीब लाभार्थींसाठी कर्ज प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून कागदपत्रांच्या अटी शिथिल कराव्यात आणि शहरात हॉकर्स झोनची निश्चिती होईपर्यंत हातगाडीधारकांवरील दंडात्मक कारवाई व तोडफोड तत्काळ थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली. या सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून, मुख्यमंत्र्यांनी लवकरच बैठकीचे आश्वासन दिल्याचे समीर यांनी सांगितले.