समृद्धीवर कारवाईच्या पद्धतीवरच प्रश्नचिन्ह; वाहनचालकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
वैजापूर
अमोल राजपूत
मागील महिनाभरात दरोडे, धाडसी चोऱ्या आणि वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच आता वैजापूर हद्दीतील समृद्धी महामार्ग पोलिसांच्या कारभारावरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भरधाव वाहने चक्क महामार्गाच्या मध्यावर अचानक अडवून महामार्ग पोलिसांकडून तपासणी केली जात असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे ‘कारवाई नेमकी कोणासाठी आणि कोणत्या नियमांतर्गत?’ असा सवाल उपस्थित होत आहे.
समृद्धी महामार्गावर वाहनांची तपासणी अथवा नियमभंगाबाबत कारवाई करायची असेल तर महामार्गावरील सुरक्षित ठिकाणी, प्रवेशद्वाराजवळ किंवा बाहेर पडताना वाहनांची तपासणी करण्याचे पर्याय उपलब्ध असताना, भरधाव वाहनांना समृद्धी महामार्गाच्या मध्यावरच थांबविण्याची कसरत का? असा प्रश्न आता वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे.महामार्गावर वाहनांचा वेग अधिक असतो. अशा परिस्थितीत पुढे अचानक एखादे वाहन थांबले आणि त्याचवेळी मागून येणाऱ्या वाहनचालकाला ही बाब लक्षात आली नाही तर काही क्षणांत गंभीर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा दृश्यमानता कमी असताना ही जोखीम आणखी वाढू शकते.कारवाईच्या नावाखाली महामार्गाच्या मध्यावरच वाहने थांबविली जात असतील तर त्या कारवाईची अधिकृत नोंद केली जाते का? कोणत्या नियमभंगासाठी वाहन अडविले जाते? प्रत्येक कारवाईची पावती दिली जाते का? वाहन थांबविण्याची पद्धत सुरक्षित आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे महामार्ग पोलिसांकडून आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अपेक्षित आहेत. नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र कारवाईची पद्धतच अपघाताला आमंत्रण देणारी ठरत असेल तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची? वाहनचालकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या यंत्रणेकडूनच सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असेल तर हा प्रकार अधिक गंभीर आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावर वाहन अडविण्याची ही पद्धत नियमांच्या चौकटीत आहे का? याची वरिष्ठ पातळीवर चौकशी होणार का? तसेच महामार्गावर अशा प्रकारे वाहन थांबविण्याबाबत पोलिस विभागाचे अधिकृत नियम आणि मार्गदर्शक सूचना काय आहेत, हे ही स्पष्ट होणे गरजेचे आहे.नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी मात्र कारवाई करताना महामार्गावरील इतर शेकडो वाहनचालकांचा जीव धोक्यात येणार नाही, याची काळजी घेणे ही देखील यंत्रणेचीच जबाबदारी आहे.
नियमभंगावर कारवाई की ‘वसुली’?
समृद्धी महामार्गावर वाहने नेमक्या कोणत्या कारणासाठी अडविली जातात? कारवाईची अधिकृत नोंद व दंडाची पावती दिली जाते का? की वाहनचालकांकडून ‘वसुली’ केली जाते? याचे उत्तर महामार्ग पोलिसांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देणे गरजेचे आहे.
दरोडेखोरांचा धोका असताना वाहनचालकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिसांकडूनच धोकादायक पद्धतीने वाहने अडविली जात असतील तर अपघात झाल्यास जबाबदार कोण? समृद्धी महामार्गावर पोलिस सुरक्षेसाठी आहेत की वाहनचालकांना अडविण्यासाठी? याची तातडीने चौकशी होणे गरजेचे आहे..
समृद्धी महामार्गावर भरधाव वाहनं थांबवून कारवाई करता येत नाही. जर एखादे संशयित वाहन वाटलेच तर महामार्गाच्या एक्झिट पॉईंटला ही बाब कळवता येते. मात्र समृद्धी महामार्गावर वाहन अडवून कारवाई करता येत नाही.
डी.एस. हाके
पोलिस उपअधीक्षक
महामार्ग पोलिस