सणासुदीत अन्नपदार्थांच्या गुणवत्तेवर ‘एफडीए’ची नजर
----
गोकुंदा, ता.१८ (बातमीदार) : सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांची मागणी वाढत असल्याने किनवट तालुक्यात अन्न व औषध प्रशासन सतर्क झाले आहे. खाद्यतेल, दूध, खवा, पनीर आणि अन्य अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास तपासणी करून नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.
किनवट तालुक्यातील बोधडी येथे जून महिन्यात खाद्यतेलाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. या नमुन्यांचा अहवाल निर्धारित मानकांनुसार असल्याचे स्पष्ट झाले. तसेच मंगाबोडी येथील आश्रमशाळेतील भोजनाच्या गुणवत्तेबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने तपासणी केली. त्यानंतर भोजनाच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.
----
तक्रारी करा, प्रशासनाकडून कारवाई
सणासुदीच्या काळात ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी प्रशासन तक्रारींची दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करणार आहे. खाद्यतेल किंवा अन्य अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत संशय असल्यास नागरिकांनी प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
---
((कोट))
तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई केली जाते. बोधडी येथे घेतलेल्या खाद्यतेलाच्या नमुन्यांचा अहवाल निर्धारित मानकांनुसार असल्याचे समोर आले. मंगाबोडी आश्रमशाळेतील भोजनाबाबत तक्रार मिळाल्यानंतर तपासणी करण्यात आली असून, भोजनाच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आहे.
-अविनाश गिरी, अन्न व औषध प्रशासन निरीक्षक.