वाळू उत्खननाच्या पैशाचे तरुणाईला आकर्षण; विद्यार्थी आणि गावच्या संस्कृतीवर परिणाम होण्याची भीती!

वाळू उत्खननाच्या पैशाचे तरुणाईला आकर्षण; विद्यार्थी आणि गावच्या संस्कृतीवर परिणाम होण्याची भीती!
Published on: 
वाळू उत्खननाच्या झटपट पैशाचे तरुणाईला आकर्षण ------------- रोजगाराच्या पारंपरिक मार्गापासून तरुण पिढी दूर जाण्याची चिंता पाथरी, ता.१४ (बातमीदार) : वाळू उत्खननातून मिळणारा पैसा पाहून गावातील लहान मुले, विद्यार्थी, तरुणाई मोठ्या प्रमाणात या व्यवसायाकडे आकर्षित होत असल्याचे चित्र समोर येत आहे. विशेष म्हणजे, कोणतेही भांडवल किंवा मोठी गुंतवणूक नसतानाही वाळूच्या धंद्यातून झटपट पैसा मिळतो, अशी धारणा तरुणांत निर्माण होत आहे. त्यामुळे शिक्षण, मेहनत आणि रोजगाराच्या पारंपरिक मार्गापासून तरुण पिढी दूर जाण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. तालुक्यात गोदापट्ट्यात वाळू उत्खननाच्या गोरखधंद्यातून अल्पावधीत मोठा पैसा मिळत असल्याचे चित्र लहान मुलांसमोर आणि विद्यार्थ्यांसमोर उभे राहत आहे. परिणामी अभ्यास करून भविष्य घडविण्यापेक्षा वाळूच्या व्यवसायात उतरून पैसा कमावण्याची मानसिकता काही तरुणांमध्ये वाढीस लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकाराचा परिणाम केवळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावरच नव्हे, तर गावाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणावरही होऊ शकतो. कष्ट, शिक्षण, प्रामाणिकपणा आणि सामाजिक प्रतिष्ठा या मूल्यांऐवजी कमी कालावधी, अल्प श्रमातून येणाऱ्या पैशाला अधिक महत्त्व मिळू लागल्यास ग्रामीण संस्कृतीसमोर नवे आव्हान उभे राहू शकते. वाळू उत्खननाच्या व्यवसायात नियमांचे पालन, पर्यावरणाचे संरक्षण आणि कायदेशीर बाबी महत्त्वाच्या असताना या व्यवसायाकडे तरुणांचा वाढता कल चिंतेचा विषय ठरत आहे. लहान वयातच पैशाचे आकर्षण निर्माण होऊन विद्यार्थी शिक्षणापासून भरकटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासन, महसूल विभाग, पोलिस यंत्रणा, ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. ((चौकट))) भावी पिढीच्या भविष्याचा प्रश्न बेकायदेशीर वाळू उत्खनन व वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासोबतच विद्यार्थ्यांत शिक्षणाचे महत्त्व आणि योग्य रोजगाराची जाणीव निर्माण करणे आवश्यक आहे. आज वाळूच्या पैशाचे आकर्षण रोखले नाही, तर उद्याची पिढी शिक्षणाऐवजी झटपट पैशाच्या मागे धावण्याची भीती आहे. त्यामुळे वाळू उत्खननाचा प्रश्न हा केवळ पर्यावरणाचा किंवा महसुलाचा नसून गावाच्या भावी पिढीच्या भविष्याचा आणि संस्कृतीचा प्रश्न बनत आहे. (((चौकट)) गुन्हेगारी प्रवृती वाढतेय वाळू व्यवसायातून आर्थिक उत्पन्न मोठ्या प्रमाणावर होत असल्याने या व्यवसायात गुंतलेल्या तरुणांत गुन्हेगारी प्रवृत्ती बळावत आहे, गेल्या काही वर्षात पाथरी पोलिसांत तीस ते पस्तीस वर्षांच्या अनेक तरुणांवर हल्ला करणे, जीवघेणा हल्ला करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आदी गुन्हे नोंद झाले असून हे गुन्हे कमी होण्याऐवजी वाढत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.