दिवाळी पहाटनिमित्त ‘संगीत रामायण’ कार्यक्रम
--------
शनिवारी पहाटे ६ः३० वाजता गायन, वादन, भरतनाट्यमचा त्रिवेणी संगम
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. ४ : दिवाळी पहाटनिमित्त परभणीकर रसिकांसाठी ‘संगीत रामायण’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अयोध्येतील श्रीराम जन्मापासून ते लंकेतील रावण वधापर्यंतचा रामायणातील प्रवास या कार्यक्रमातून संगीताच्या माध्यमातून उलगडला जाणार आहे. उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंतचा सांगीतिक प्रवास घडविणारा हा कार्यक्रम गायन, वादन आणि भरतनाट्यम नृत्य अशा कलांचा त्रिवेणी संगम ठरणार आहे.
कार्यक्रमात मयंक परळीकर गायन सादर करणार असून, रामदास कुलकर्णी वादनाची साथ देणार आहेत. ऐश्वर्या डावरे भरतनाट्यमच्या माध्यमातून रामायणातील विविध प्रसंग सादर करणार आहेत. सूत्रसंचालन सौरभ कुरुंदकर करणार आहेत. ९० मिनिटांच्या या सांगीतिक आविष्कारातून रामायणातील महत्त्वपूर्ण प्रसंगांची अनुभूती रसिकांना घेता येणार आहे. भारतीय संगीत, नृत्यकलेचा सुरेल आविष्कार अनुभवण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने परभणीकरांना मिळणार आहे. शनिवार, ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ः३० वाजता नांदखेडा रोडवरील वैष्णवी मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रम नियोजित वेळेतच सुरू होणार असल्याने रसिकांनी वेळेपूर्वी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
--------------