संजय गांधी निराधार समितीच्या
अध्यक्षपदी राजकुमार पाटील
---
उदगीर, ता. १३ (बातमीदार) : संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची तालुक्यासाठी पुनर्रचना करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षांसह अशासकीय व शासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. या समितीमध्ये अध्यक्ष
म्हणून हाळी येथील राजकुमार जनार्दन पाटील यांची निवड करण्यात आली.
याशिवाय गुडसूर येथील उमादेवी तोडकर यांची महिला प्रतिनिधी, मोघा येथील प्रशांत धनाजी लोभाजी यांची दिव्यांग प्रतिनिधी, उदगीर येथील फय्याज नसरुद्दीन शेख यांची सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी व्यक्ती म्हणून, तर वाढवणा बु. येथील इंद्रजित पुंडलिक हाळणे यांची ज्येष्ठ नागरिक प्रतिनिधी म्हणून सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. या समितीमध्ये गटविकास अधिकारी किंवा उदगीर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांचा शासकीय सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. उदगीरचे तहसीलदार हे समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत निराधार, गरजू, दिव्यांग, विधवा तसेच विविध पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ही समिती महत्त्वाची भूमिका बजावते. पात्र लाभार्थ्यांच्या प्रस्तावांची छाननी करून त्यांना अनुदानाचा लाभ मिळवून देणे, तसेच योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियमित बैठका घेण्याची जबाबदारी समितीवर राहणार आहे.