
पैठण : आषाढी वारीसाठी शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे बुधवारी (ता. १८) सायंकाळी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. प्रस्थानप्रसंगी नाथांच्या पादुकांच्या दर्शनासाठी व पालखी सोहळ्याला निरोप देण्यासाठी गोदाकाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. उपस्थितांनी विठुरायासह नाथांच्या नामाचा गजर केला. यंदाच्या या सोहळ्यात १२० किलो चांदीपासून तयार केलेल्या रथाचा समावेश आहे. मानाच्या असलेल्या या पालखी सोहळ्याचे यंदाचे ४२६ वे वर्ष आहे.