esakal | संतपीठ लोकार्पण अन् ‘झेडपी’ला मिळणार हक्काची इमारत
sakal

बोलून बातमी शोधा

संतपीठ लोकार्पण

संतपीठ लोकार्पण अन् ‘झेडपी’ला मिळणार हक्काची इमारत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद (पैठण) : पैठणमधील नाथसागराच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या संतपीठाचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी शुक्रवारी (ता. १७) होत आहे. संतपीठ येथे पालकमंत्री सुभाष देसाई, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, रोहयो व फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे यांची प्रमुख उपस्थिती राहील. दरम्यान, संतपीठाचे प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते औरंगाबाद येथे उद्‍घाटन झाल्यानंतर पैठण येथे संतपीठाचे प्रत्यक्षात उद्‍घाटन मंत्री उदय सामंत, संदीपान भुमरे यांच्या हस्ते फीत कापून होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, संतपीठ उद्‍घाटनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने गुरुवारी भव्य व सुसज्ज इमारतीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता राजेंद्र बोरकर यांच्या मार्गदर्शनात मनमोहक रंगांमध्ये विद्युत रोषणाई केली आहे.

जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजनही शुक्रवारी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे सकाळी ९.२५ मिनिटाला जिल्हा परिषदेच्या इमारतीचे भूमिपूजन करतील. उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, रोजगार हमी, फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे, महसूलमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच खासदार इम्तियाज जलील, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार अंबादास दानवे, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रशांत बंब, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार उदयसिंग राजपूत, आमदार रमेश बोरनारे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, उपाध्यक्ष एल.जी गायकवाड, अर्थ व बांधकाम सभापती किशोर बलांडे, शिक्षण सभापती अविनाश गलांडे, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण आदींची उपस्थिती राहणार आहे.

हेही वाचा: 'खासदार इम्तियाज जलील यांनी राजकारण करु नये'; पाहा व्हिडिओ

महापालिकेच्या आठ रुग्णवाहिकांचे लोकार्पण

राज्य सरकारने दिलेल्या सीएसआर निधीतून महापालिकेने दोन कार्डियाक व सहा साध्या रुग्णवाहिका खरेदी केल्या आहेत. या रुग्णवाहिकांचे लोकार्पणसुद्धा शुक्रवारी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते केले जाणार आहे.

राज्य शासनाने आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागामार्फत दोन कोटीचा निधी सीएसआर फंडातून महापालिकेला दिला होता. त्यातून दोन कार्डियाक व सहा साध्या रुग्णवाहिका खरेदी करण्याचा निर्णय प्रशासकांनी घेतला. एक कोटी ३७ लाख १८ हजार रुपयाचा खर्च करून या रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी जिल्हा परिषद मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या रुग्णवाहिकांचे लोकार्पण होणार आहे, असे कार्यकारी अभियंता डी. के. पंडित यांनी सांगितले.

loading image
go to top