बायपास परिसरात खोदकाम
करताना गॅस लाइन फुटली
---
सातारा परिसर, ता. २० ः बीड बायपास परिसरात ड्रेनेज लाइनचे खोदकाम सुरू असताना अचानक भारत गॅसची भूमिगत पाइपलाइन फुटली. त्यामुळे गळती सुरू झाली. अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला सकाळी ११.४५ वाजता कॉल आला. यानंतर ड्यूटी ऑफिसर सूरज राठोड आणि त्यांचे पथक अग्निशमन बंबासह तातडीने रवाना होऊन ११.५३ वाजता घटनास्थळी पोचले. गॅस मोठ्या प्रमाणावर लिक होत असल्याने जवानांनी तातडीने परिसरात बॅरिकेडिंग करून नागरिकांना दूर केले. सुदैवाने त्याठिकाणी वाऱ्याचा वेग जास्त असल्याने गॅस हवेत विरघळून जात होता. तरीही सुरक्षेचा उपाय म्हणून अग्निशमन दलाने गळतीवर पाण्याचा जोरदार मारा सुरू केला.
यानंतर भारत गॅसच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून गॅसचा मुख्य व्हॉल्व्ह बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. भारत गॅसच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांनी तत्परतेने गळती रोखली आणि दुपारी दोनच्या सुमारास गॅस लाइन पूर्ववत केली, तेव्हा परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. ही कामगिरी मुख्य अग्निशमन अधिकारी खांडेकर आणि उप अग्निशमन अधिकारी संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ड्यूटी ऑफिसर सूरज राठोड, फायरमन दीपक गाडेकर, प्रसाद शिंदे, विक्रांत बकले, उमेश भोसले आणि वाहनचालक एन. आर. घुगे यांच्या पथकाने पार पाडली.