ABD26J81643
नांदुरा येथील सटवाई माता.
--
ABD26J81642
नांदुरा (ता. हिंगोली) ः येथील सटवाई माता मंदिरात नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत असून, या उत्सवानिमित्त भाविक दर्शनाकरिता गर्दी करीत आहेत.
-----
सटवाई माता मंदिरात चारशे वर्षांची परंपरा कायम!
-
नवरात्रोत्सवात महाराष्ट्रासह परराज्यांतील भाविकांची हजेरी; कार्यक्रमांमुळे परिसर भक्तिमय
--
हिंगोली, ता. १८ : तालुक्यातील नांदुरा येथील श्री सटवाई माता मंदिरात सुमारे चारशे वर्षांपासून चालत आलेली घटस्थापनेची परंपरा आजही भक्तिभावाने जपली जात आहे. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमधील भाविक देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.
सुमारे सातशे ते आठशे लोकसंख्या असलेल्या नांदुरा गावातील श्री सटवाई माता मंदिर भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र मानले जाते. संततीप्राप्ती, नवजात बालकांचे आरोग्य, दीर्घायुष्य आणि कुटुंबाच्या सुख- समृद्धीसाठी भाविक माता सटवाईच्या चरणी प्रार्थना करतात. वर्षभर या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येतात. विशेष घरात बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याला कुटुंबीयांसह सटवाई मातेच्या दर्शनासाठी आणले जाते. सध्या सटवाई माता मंदिरात नवरात्रोत्सव सुरू असून, यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
--
संत खोब्रा यांनी सुरू केली परंपरा
स्थानिक मान्यतेनुसार, खोब्रा नामक संत महिलेने नांदुरा येथे सटवाई माता मंदिरात घटस्थापनेची परंपरा सुरू केली. तेव्हापासून दरवर्षी शारदीय नवरात्रोत्सवाची सुरवात घटस्थापनेने केली जाते. यंदाही ११ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेने उत्सवाला प्रारंभ झाला. सुमारे चारशे वर्षांची ही परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे.
--------
नवजात बालकांच्या कल्याणासाठी प्रार्थना
बाळाच्या जन्मानंतर पाचव्या दिवशी पंचवीची पूजा करण्याची परंपरा आहे. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील काही भागांत सातव्या दिवशी हा विधी केला जातो. या पूजेद्वारे नवजात बालकाच्या उत्तम आरोग्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली जाते. माता सटवाईला बालकांचे रक्षण करणारी देवी मानले जाते.
-------
संस्थेमार्फत मंदिराचे व्यवस्थापन
२०१७ पासून श्री सटवाई मंदिर संस्थेमार्फत मंदिराचे व्यवस्थापन केले जात आहे. संस्थेचे अध्यक्ष जगन किशन तनपुरे असून, इतर पदाधिकारी व सदस्य मंदिरातील धार्मिक उपक्रमांची व्यवस्था पाहतात. नवरात्रोत्सवाच्या काळात दररोज पूजा-अर्चा आणि विविध धार्मिक कार्यक्रम होत असून, भाविकांच्या उपस्थितीमुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. श्रद्धा, परंपरा आणि धार्मिक एकात्मतेचा वारसा जपणारे हे मंदिर भाविकांसाठी आस्थेचे स्थान ठरत आहे.