‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’
------
जिल्हाधिकारी कर्डिले ः दुष्काळावर मात करण्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी पुढाकार घ्यावा
-------
सकाळ वृत्तसेवा
नांदेड, ता. २८: जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि पशुधनाची काळजी घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शाळा, विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. पाणीबचत, जनजागृती आणि लोकसहभागाच्या माध्यमातून दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी विद्यार्थी,
पालक, शिक्षकांसह सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी केले.
विद्यार्थ्यांनी शाळेत आणि घरी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. भाजी धुतल्यानंतर उरलेले पाणी झाडांसाठी वापरावे, जलस्रोतांची माहिती घ्यावी, पाणीबचतीबाबत जागृती करावी, अशा छोट्या कृतींतून जलसंवर्धनाचे संस्कार रुजवावेत, असे आवाहन केले आहे. तसेच शिक्षकांनी निबंध, वक्तृत्व, चित्रकला आणि पोस्टर स्पर्धा, प्रभातफेरी, परिसंवाद तसेच पथनाट्यांच्या माध्यमातून पाणीबचत, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि दुष्काळ निवारणाबाबत जनजागृती करावी, असे प्रशासनाने सुचविले आहे.
--------
पालकांनीही द्यावा हातभार
पालकांनी घरातील पाण्याचा काटकसरीने वापर करावा, नळांची गळती तातडीने दुरुस्त करून घ्यावी आणि मुलांमध्ये वृक्षसंवर्धन, स्वच्छता व निसर्गप्रेमाचे संस्कार रुजवावेत. दिवाळी आणि अन्य सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करून प्रदूषण टाळावे. तसेच, दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी आणि पशुपालक कुटुंबांना चारा व पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
---
शाळांनी कृती आराखडा तयार करावा
मुख्याध्यापकांनी शाळास्तरावर पाणीबचत व पर्यावरण संवर्धन समिती स्थापन करावी. शाळेतील जलस्रोतांची तपासणी करणे, पाण्याची गळती रोखणे आणि आवश्यक दुरुस्ती करून घेणे यावर भर द्यावा. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या सहभागातून दुष्काळ निवारणासाठी कृती आराखडा तयार करून स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधावा.
---
‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’
‘पाणी वाचवा, जीवन वाचवा; जनावरे जगवा, शेतकऱ्यांना साथ द्या आणि पर्यावरण जपा,’ हा संदेश या अभियानातून देण्यात येत आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. पाण्याची बचत, पशुधनाचे संरक्षण आणि शेतकऱ्यांना सहकार्य करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.