Chhatrapati Sambhaji Nagar : स्वतः ॲसिड झेलत महिलेला वाचवले; पती-पत्नीच्या वादात निडर तरुण गंभीर

महिलेला मदत करताना तिच्या नवऱ्याने फेकलेले ॲसिड या तरुणाच्या चेहऱ्यावर आले
Acid attack
Acid attacksakal

वाळूज महानगर : काम संपून तो घरी जाण्यासाठी कंपनी बाहेर पडला. काहीच पावलांवर पुढे असलेल्या एका महिला सहकाऱ्यावर ॲसिड फेकण्यासाठी तिचा नवरा आला. त्याच्या हातातील बॉटल बघून त्याची पत्नी मदतीसाठी ओरडत मागे धावली. त्याच वेळी मागे असलेला तरुण मदतीला धावला. महिलेला मदत करताना तिच्या नवऱ्याने फेकलेले ॲसिड या तरुणाच्या चेहऱ्यावर आले. यात तो गंभीर जखमी झाला.

ही घटना शनिवारी (ता. २१) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. प्रेम अप्पासाहेब साबळे (वय १८) असे या निडर तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः प्रेम हा जोगेश्वरी येथील जोगवाई माता मंदिराजवळ आई, वडील, भाऊ कृष्णा यांच्यासह राहतो. वाळूज औद्योगिक वसाहतीतील एम सेक्टरच्या जोगेश्वरी येथील एका अत्तराच्या कंपनीमध्ये तो नोकरीला आहे. कंपतीतील काम संपल्याने सायंकाळी साडेपाचच्या सुमारास

तो घरी जाण्यासाठी सहकाऱ्यांसह बाहेर आला. त्याच्यासोबत कंपनीत काम करणाऱ्या सुनीता नीळ या काही महिलांसोबत पुढे थोड्या अंतरावर पायी जात होत्या. दरम्यान, सुनीता यांचा पती रमेश नीळ तिथे आला. तो सुनीता यांना भांडायला लागला.

त्याने एका बॉटलमध्ये ॲसिड आणले होते. नवरा आता आपल्या अंगावर ॲसिड फेकणार म्हणून सुनीता मदतीसाठी ओरडत मागे धावत आल्या. यावेळी प्रेम मदतीसाठी धावला. दरम्यान, रमेशने सोबत आणलेल्या बॉटलमधील ॲसिड सुनीताच्या दिशेने फेकले.

हे ॲसिड प्रेमच्या चेहऱ्यावर पडले. यात त्याच्या चेहऱ्याला आणि डोळ्यांजवळ गंभीर इजा झाली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेम याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्याच्या धाडसाचे कौतुक होत आहे.

घरची परिस्थिती बेताची

प्रेमच्या घरची परिस्थिती बेताची आहे. आपल्या आई-वडिलांना हातभार लागावा म्हणून सहा महिन्यांपूर्वी त्याने कंपनीत काम सुरू केले होते. या हल्ल्यात त्याच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत प्रेम साबळे या तरुणाने आपला जीव धोक्यात घालत भावाच्या नात्याने त्या महिलेचे प्राण वाचवले. सख्खा भाऊसुद्धा आपल्या बहिणीसाठी एवढे करू शकत नाही. त्यामुळे त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. एक दक्ष नागरिक म्हणून त्याने हे कर्तव्य केले.

- अविनाश आघाव, पोलिस निरीक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com