अंशतः व अनुदानित शाळांची तपासणी
लेखापरीक्षण, लेखाधिकारी एस.पी. जाधव यांचा दौरा; १४ ते २८ तारखेपर्यंत विविध शाळांना भेटी
छत्रपती संभाजीनगर, ता.१४ : जिल्ह्यातील अनुदानित व अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचे लेखापरीक्षण करण्यासाठी लेखाधिकारी (शिक्षण) एस.पी. जाधव यांनी जिल्हाभरातील शाळांचा संभाव्य दौरा निश्चित केला. नोव्हेंबर महिन्यात विविध टप्प्यांत होणाऱ्या या दौऱ्यात शाळांमधील लेखा अभिलेख, अनुदान खर्च आणि संबंधित आर्थिक नोंदींची तपासणी केली जाणार आहे. त्यानुसार संबंधित मुख्याध्यापकांनी आवश्यक कागदपत्रे व अभिलेखे तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जाधव यांच्या दौऱ्याच्या कार्यक्रमानुसार १४ ते २२ नोव्हेंबरदरम्यान विविध शाळांची लेखापरीक्षणासाठी निवड केली आहे. त्यानंतर २५ ते २८ नोव्हेंबर या कालावधीतही शाळांना भेटी देऊन लेखापरीक्षण केले जाणार आहे. या दौऱ्यात ग्रामीण भागातील विविध माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचा समावेश आहे. संबंधित शाळांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन आर्थिक व्यवहारांची पडताळणी केली जाणार आहे. लेखापरीक्षणाच्या कालावधीत संबंधित कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची रजा घेऊ नये, असेही निर्देश पत्राद्वारे दिले आहेत. मागणी केल्यानंतर आवश्यक अभिलेखे तातडीने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित शाळा प्रशासनाची राहील, असे आदेशात नमूद केले आहे.
---
या बाबींची होणार पडताळणी
लेखापरीक्षणाच्या वेळी मागील वर्षांचे लेखा अभिलेखे, रोकडवही, उपस्थितीपट, वेतन नोंदी, अनुदानासंबंधी कागदपत्रे, वैयक्तिक मान्यता, बदली मान्यता, सेवाज्येष्ठता यादी तसेच विविध आदेशांच्या प्रती उपलब्ध ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी स्वतंत्र अभिलेखांची तपासणी केली जाणार आहे.