सातासमुद्रापार पोचणार घरच्या फराळाचा गोडवा
सकाळ वृत्तसेवा
बीड, ता. १: नोकरी, व्यवसाय किंवा उच्च शिक्षणाच्या निमित्ताने आपल्या गावापासून दूर राहणाऱ्या तसेच परदेशात वास्तव्य करणाऱ्या आपल्या लाडक्या नातेवाइकांना आणि मित्रमंडळींना घरचा दिवाळी फराळ कसा पाठवावा, याची चिंता सणासुदीच्या काळात प्रत्येकालाच सतावत असते. नागरिकांची हीच गरज आणि भावनिक ओढ ओळखून भारतीय डाक विभागाने (इंडिया पोस्ट) यंदाही फराळ देश-विदेशात पोचवण्यासाठी अत्यंत सोयीस्कर अशी विशेष पार्सल सेवा उपलब्ध करून दिली आहे. खासगी कुरिअर कंपन्यांच्या अवाजवी आणि मनमानी शुल्कापेक्षा पोस्टाची पार्सल सेवा ही अत्यंत विश्वासाची, सुरक्षित आणि सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी असल्याने बीडमधील नागरिकांचा या सुविधेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
दिवाळीच्या या प्रकाशोत्सवात आपल्या माणसांपर्यंत प्रेमाची शिदोरी आणि घरच्या चवीचा फराळ लवकरात लवकर व सुखरूप पोचावा, यासाठी बीड डाक विभागाने प्रशासकीय पातळीवर जय्यत तयारी केली आहे. या सुविधेमुळे आता परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांसाठी तब्बल ९०० पेक्षा अधिक देशांमध्ये घरचा फराळ पाठवणे शक्य झाले आहे. नागरिकांना त्यांच्या जवळच्या मुख्य डाकघरात (हेड पोस्ट ऑफिस) किंवा उप-डाकघरात जाऊन फराळाचे पार्सल सहजतेने बुक करता येणार आहे. पार्सल बुक करताना पाठवणाऱ्याचा आणि प्राप्तकर्त्याचा अचूक पत्ता, वैध पिन कोड आणि सध्या सुरू असलेला (ॲक्टिव्ह) मोबाइल क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे पार्सल योग्य व्यक्तीपर्यंत वेळेत पोचण्यास मदत होईल.
परदेशात किंवा देशांतर्गत दूरवर पाठवले जाणारे फराळाचे पदार्थ प्रवासात खराब होऊ नयेत, यासाठी नागरिकांनी पॅकिंग करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन टपाल विभागाने केले आहे. चकली, लाडू, करंजी आणि शंकरपाळ्यांसारखे नाजूक पदार्थ हवाबंद (एअर-टाईट) डब्यामध्ये घट्ट भरावेत. त्यानंतर या डब्याला बाहेरून सुरक्षित आवरण लावून ते एका मजबूत खोक्यात सीलबंद केल्यास पार्सल पूर्णपणे सुरक्षित राहते. यामुळे फराळाचा चुरा होत नाही आणि त्याची मूळ चव व दर्जा कायम राहतो.
----
देशांतर्गत पार्सलसाठी वजनानुसार दरपत्रक (रुपयांत)
वजन (ग्रॅमपर्यंत) स्थानिक राज्यांतर्गत अन्य राज्ये
५०० २८ ६५ ७२
१००० ४८ ९१ ११४
१५०० ६० ११७ १७१
२००० ८७ १४६ २३९
३००० / ४००० ११६ २१९ ३३७
४००० / ५००० १७४ ३२४ ५१५
------------
आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा दर (रुपयांत)
देश २ कि.ग्रॅ. ५ कि.ग्रॅ. १० कि.ग्रॅ. १५ कि.ग्रॅ.
अमेरिका २,०८३ ५,०५० ९,१८० १३,३१०
यूके १३८७ ४,१३७ ४,७८७ १०,४३७
जर्मनी १,४४० ३,६९९ ५,७०५ ७,७११
यूएई / दुबई १,१८२ १,९०० ३,०८० ४,३६०
ऑस्ट्रेलिया २,५३८ ४,१९७ ९,००९ १३,०२९
रशिया १,६६९ ४,४०७ ७,२३८ १०,०७१
----
भारतीय डाक विभाग नेहमीच ग्राहकांच्या विश्वासाला आणि अपेक्षेला खऱ्या अर्थाने पात्र ठरला आहे. खासगी कुरिअरच्या तुलनेत पोस्टाचे दर आजही अत्यंत किफायतशीर व सुरक्षित आहेत. नागरिकांनी दिवाळीच्या शेवटच्या क्षणी होणारी गर्दी आणि धावपळ टाळण्यासाठी आपल्या फराळाचे पार्सल लवकरात लवकर जवळच्या डाकघरात येऊन बुक करावे.
- संजय आंबेकर, डाक अधीक्षक, बीड