देश-परदेशात पोचवा घरच्या फराळाचा गोडवा
-----------
दिवाळीनिमित्त टपाल सेवेची पार्सल बुकिंगची सुविधा; कार्यालयात करता येणार नोंद
-------
हिंगोली, ता. १ : दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि घरगुती फराळाची मेजवानी. नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणानिमित्त घरापासून दूर राहणाऱ्या मुलांना व नातेवाइकांना घरच्या फराळाची चव चाखता यावी, यासाठी भारतीय टपाल विभागाची पार्सल सेवा उपयुक्त ठरत आहे. चकली, चिवडा, लाडू, करंजी, शंकरपाळे आणि मिठाई अशा विविध पदार्थांचा गोडवा टपाल सेवेद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यात तसेच परदेशातही पोचविता येणार असल्याची माहिती डाक अधीक्षक सतीश पाठक यांनी दिली.
जिल्ह्यातील अनेक कुटुंबांचे नातेवाईक पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि हैदराबाद यांसारख्या शहरांत राहतात. काहींची मुले उच्च शिक्षणासाठी, तर अनेक जण नोकरी व व्यवसायानिमित्त परदेशात स्थायिक झाले आहेत. दिवाळीच्या काळात प्रत्येकाला गावी येणे शक्य होत नसल्याने घरातील मंडळींनी प्रेमाने तयार केलेला फराळ टपालाने पाठविण्यास पसंती दिली जाते. त्यामुळे दूर राहणाऱ्या आप्तस्वकीयांनाही घरच्या सणाचा आनंद अनुभवता येतो.
भारतीय टपाल विभागाच्या दरपत्रकानुसार, ५०० ग्रॅमपर्यंतच्या पार्सलसाठी स्थानिक पातळीवर २८ रुपये, राज्यांतर्गत ६५ रुपये, तर अन्य राज्यांत पाठविण्यासाठी ७२ रुपये शुल्क आकारले जाते. दरम्यान, १ ऑगस्ट २०२६ पासून पार्सलचे सुधारित दर लागू झाले आहेत. त्यानुसार दोन ते पाच किलो वजनाच्या पार्सलसाठी नवीन शुल्क आकारले जात आहे. अन्य राज्यांत पाच किलो वजनाचे पार्सल पाठविण्यासाठी ५१५ रुपये मूळ शुल्क असून, त्यावर लागू जीएसटी आकारला जाणार आहे.
--------
शंभरहून अधिक देशांची सुविधा
परदेशात राहणाऱ्या नातेवाइकांनाही दिवाळीचा आनंद देता यावा, यासाठी आंतरराष्ट्रीय टपाल सेवेचा पर्याय उपलब्ध आहे. अमेरिका, कॅनडा, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनसह शंभरहून अधिक देशांत फराळ व भेटवस्तू पाठविण्याची सुविधा आहे. मात्र, प्रत्येक देशाचे खाद्यपदार्थ आयातीसंदर्भातील नियम वेगवेगळे असल्याने पार्सल पाठविण्यापूर्वी संबंधित देशाचे नियम, पदार्थांचे स्वरूप, पॅकिंग आणि वजन यांची माहिती घेणे आवश्यक आहे.
------
वजनानुसार शुल्क
हिंगोली शहरातील मुख्य टपाल कार्यालयासह पार्सल बुकिंगची सुविधा असलेल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये फराळ पाठविण्यासाठी बुकिंग करता येणार आहे. फराळ व्यवस्थित आणि सुरक्षित पद्धतीने पॅक करून पाठविणाऱ्याचे व स्वीकारणाऱ्याचे संपूर्ण नाव, पत्ता, पिनकोड आणि मोबाइल क्रमांक नमूद करावा. टपाल कार्यालयात पार्सलचे वजन केल्यानंतर त्यानुसार शुल्क निश्चित केले जाईल.
---------
हिंगोलीतून पाठवा देशासह परदेशात फराळ
टपाल विभागाने दिवाळीचा फराळ पाठविण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. टपाल विभागाची आंतरराष्ट्रीय पार्सल सेवेअंतर्गत जगभरातील जवळपास शंभरपेक्षा अधिक देशांत इंडिया पोस्टच्या माध्यमातून दिवाळीचा फराळ पाठविण्यात येतो.
--------
आंतरराष्ट्रीय पार्सलचे दर (दहा किलो वजन)
देश - भारतीय डाक (दर)
ऑस्ट्रेलिया - १९९१२
सिंगापूर - ४३७८
रशिया- ६७५०
दुबई - ३४९३
यूके - ६४५१
कॅनडा - ९६७६
चीन - ६०९५
जर्मनी - ५८७६