कर्ज हप्ते कपात न केल्यास
सेनगावात २७ पासून उपोषण
सेनगाव, ता. २४ (बातमीदार) : कर्जदार कर्मचाऱ्यांच्या वेतनातून थकीत कर्ज हप्त्यांची कपात न केल्यास येत्या २७ ऑक्टोबरपासून पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेने दिला आहे. याबाबत पतसंस्थेचे अध्यक्ष व्ही.डी. देशमुख व सचिव एम.आर. गडदे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले.
सेनगाव तालुका जि.प. कर्मचारी पतसंस्था ही स्वभांडवलावर चालणारी नफाक्षम संस्था असून, यंदा सभासदांना १२ टक्के लाभांश वाटप केला जाणार आहे. मात्र, काही कर्जदार सभासद आणि त्यांचे वेतन देयक अधिकारी हप्ते कपातीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा कलम ४९ (२) अन्वये पगार कपातीचे हमीपत्र दिलेले असतानाही काही अधिकारी थकबाकीदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप संचालक मंडळाने केला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्याने संस्थेचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. सादर यादीनुसार ऑक्टोबरच्या वेतनातून हप्ते कपात न झाल्यास संपूर्ण संचालक मंडळ बेमुदत उपोषणास बसेल, असा इशारा देण्यात आला आहे. ‘पतसंस्थेचे आणि सभासदांचे आर्थिक हित जपण्यासाठी आम्ही कोणत्याही टोकाच्या संघर्षाला तयार आहोत,’ असे व्ही.डी. देशमुख म्हणाले.