कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात
आरोग्य तपासणी, उपचार शिबिर
कळमनुरी, ता.५ (बातमीदार)ः उपजिल्हा रुग्णालयात ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त नुकतेच आयुष विभागातर्फे सेवा संकल्प अभियान अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिरात १५७ रुग्णांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. यावेळी तज्ज्ञांनी उपस्थित रुग्णांना आयुर्वेदाचे महत्त्व व उपचार पद्धतीबाबत माहिती दिली.
उपजिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले. प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शेषराव नरवाडे, आयुष विभागाचे तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश पंचलिंगे, डॉ. बालाजी जाधव, डॉ. सोनाली देशमुख, डॉ. सोफिया खान, डॉ. नावेद अथर यांची उपस्थिती होती. या शिबिरात ज्येष्ठ नागरिकांची सामान्य आरोग्य तपासणी व आयुर्वेदानुसार तज्ञांच्या उपस्थितीत प्रकृती परीक्षण केलेल्या रुग्णांच्या आरोग्य स्थितीनुसार आवश्यक आहार विहार व दिनचर्येबाबत मार्गदर्शन करुन औषधोपचार करण्यात आले. याशिवाय वयोमानानुसार सौम्य योगासने, योगाभ्यास घेऊन योगासंदर्भात माहिती देण्यात आली.ज्येष्ठ नागरिकांत आढळून येणाऱ्या हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, संधिवात, वात विकार, अजीर्ण, बद्धकोष्ठता, निद्रानाश व मानसिक स्वास्थ्य या संदर्भात योग्य वेळी योग्य आहार व नियमित दिनचर्या बाबत ची माहिती तज्ञांनी दिली आरोग्य शिबिरामध्ये रुग्णांची तपासणी करून त्यांना आयुर्वेदिक औषधी चे वाटप करण्यात आले. शिबिरात १५७ रुग्णांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालयांतर्गत वैद्यकीय अधिकारी व आयुष विभागांतर्गत तज्ज्ञ, कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.
----------