(((( आरोग्य विमा ))))
....
ज्येष्ठांच्या आरोग्य विम्याबाबत हे लक्षात ठेवा
.....
वयाबरोबर आरोग्य खर्च वाढतो, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विमा हे केवळ आर्थिक संरक्षण नसून वेळेवर उपचार मिळण्याचे महत्त्वाचे साधन आहे. पॉलिसी घेताना फक्त विमा रक्कम न पाहता अटी, प्रतीक्षा कालावधी, सहभरणा आणि खर्चमर्यादा तपासणे आवश्यक आहे.
हे महत्त्वाचे मुद्दे विसरू नका
१. वय जास्त असले तरी विमा नक्कीच मिळू शकतो. प्रवेश वय व अटी पॉलिसीनुसार वेगळ्या असतात.
२. मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार यांसारखे पूर्वअस्तित्वातील आजार प्रस्ताव अर्जात लपवू नयेत. यामुळे भविष्यात दावा नाकारला जाऊ शकतो.
३. प्रतीक्षा कालावधी समजून घ्या. कोणत्या आजाराला किती कालावधी लागू आहे, तो कधीपासून मोजला जातो, आणि नूतनीकरणावर त्याचा परिणाम काय?
४. सहभरणा म्हणजे ठरावीक टक्के रक्कम विमाधारकाला स्वतः भरावी लागणे (उदा. २० टक्के सहभरणा असल्यास एक लाख रुपयांच्या बिलात २० हजार रुपये स्वतः भरावे लागू शकतात).
५. खोली भाडे मर्यादेकडे दुर्लक्ष करू नका. मर्यादेपेक्षा महाग खोली घेतल्यास इतर खर्चावरही परिणाम होऊ शकतो.
६. रोकडरहित सुविधा म्हणजे संपूर्ण बिल माफ होणे नव्हे. वजावट, सहभरणा, वैद्यकेतर खर्च व वगळलेले आजार रुग्णाला स्वतः भरावे लागतात.
७. विमा कंपनी बदलताना फक्त कमी हप्ता न पाहता सातत्य लाभ, प्रतीक्षा कालावधी, नो-क्लेम बोनस आणि नूतनीकरण अटी तपासा; जुनी पॉलिसी बंद करण्याआधी नवीन सुरू झाल्याची खात्री करा.
८. नूतनीकरण वेळेवर करा. अंतिम तारीख व सवलत कालावधी लक्षात ठेवा; पॉलिसी कागदपत्रे व हेल्पलाइन नंबर विश्वासू कुटुंब सदस्याकडेही ठेवा.
९. आवश्यक कागदपत्रे (पॉलिसी, पावत्या, ओळखपत्र, वैद्यकीय नोंदी, बिले, डिस्चार्ज सारांश) जतन करा, शक्य असल्यास डिजिटल प्रतही ठेवा.
१०. दावा नाकारल्यास लेखी कारण मागा, पॉलिसी अटी तपासा आणि आवश्यक असल्यास तक्रार निवारण यंत्रणेचा किंवा कायदेशीर मार्गाचा वापर करा.
पॉलिसी घेण्यापूर्वीची तपासणी यादी
प्रवेश वयाची अट काय?, प्रतीक्षा कालावधी किती?, सहभरणा किती?, खोली भाडे मर्यादा आहे का?, अतिदक्षता विभाग खर्चावर स्वतंत्र मर्यादा?, कोणते आजार वगळलेले आहेत?, रोकडरहित हॉस्पिटल्स कोणती?, नूतनीकरण अटी काय?, तक्रार कुठे करायची?, सर्व अटी लेखी मिळाल्या आहेत का?
- ॲड.डॉ. प्रमोद चव्हाण
९४२२२०१३९१