पान चार लीड
सेवाभावातून गावागावांत विकासाचा संकल्प
पालकमंत्र्यांच्या हस्ते अभियानाचा प्रारंभ; जिल्ह्यातील १,३२२ ग्रामपंचायतींत विविध उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
नांदेड, ता. १८ : शासनाच्या योजना आणि विविध लोककल्याणकारी सेवा थेट गावपातळीवर पोहोचविण्यासह प्रलंबित कामांचा निपटारा, स्वच्छता, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि शिक्षणाला गती देण्यासाठी जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानाला सुरवात झाली आहे. पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते गुरुवारी (ता. १७) या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यातील १,३२२ ग्रामपंचायतींमध्ये विविध उपक्रमांना प्रारंभ झाला.
अभियानाच्या प्रारंभी गावागावांत सेवाभावाची शपथ घेण्यात आली. नागरिकांना शासनाच्या विविध योजना आणि लोककल्याणकारी उपक्रमांची माहिती देण्यात आली. शासनाच्या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांच्या हस्ते ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करण्यात आला. अनेक गावांत ग्रामस्वच्छता उपक्रम आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. देशसेवेत योगदान देणारे माजी सैनिक तसेच हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान करून त्यांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
सेवा संकल्प अभियानांतर्गत महिनाभर गावपातळीवर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. नवीन बचत गटांची स्थापना, शाळा व अंगणवाड्यांसह कुटुंबांना नळ जोडणी, सार्वजनिक व दुर्लक्षित ठिकाणांची स्वच्छता, कापडी पिशव्यांच्या वापराबाबत जनजागृती, निबंध व चित्रकला स्पर्धा, दिव्यांग व्यक्तींची नोंदणी, वृक्षारोपण, भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण, तसेच आरोग्य व पोषणविषयक मार्गदर्शन केले जाणार आहे.
शिक्षण, आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा, स्वच्छता, समाजकल्याण, महिला व बालविकास, कृषी, पशुसंवर्धन, ग्रामपंचायत, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि सामान्य प्रशासन आदी विभागांचा अभियानात समन्वयाने सहभाग राहणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावरील प्रलंबित कामांना गती मिळण्यासोबतच शासनाच्या सेवा आणि योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.
विविध ऑनलाइन सेवा देण्यावरही भर
विद्यार्थ्यांना जात, उत्पन्न व रहिवासी प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे, महिला सक्षमीकरणाचे उपक्रम, किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य व मार्गदर्शन शिबिरे, सायबर सुरक्षेबाबत जनजागृती, शेतकऱ्यांना मार्गदर्शन, आधार नोंदणी, कर वसुली, आयुष्मान भारत कार्ड नोंदणी आणि विविध ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेचे सूक्ष्म नियोजन
अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांनी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन सूक्ष्म नियोजन केले आहे. गावपातळीवरील नागरिकांच्या गरजा आणि प्रलंबित कामांचा आढावा घेऊन त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.