Aurnagabad : भारतात सात कोटी सत्तर लाख मधुमेही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aurnagabad

भारतात सात कोटी सत्तर लाख मधुमेही

औरंगाबाद : भारतात सुमारे सात कोटी सत्तर लाख मधुमेह टाइप-२ चे रुग्ण आहेत, ही गंभीर बाब असली तरीही यापेक्षा जास्त गंभीर म्हणजे यातील निम्म्या रुग्णांना मधुमेह असल्याची जाणीव झालेली नसते. लठ्ठपणा आणि मधुमेह यांचा परस्परांशी संबंध असून या दोन्ही समस्या एकमेकांशी निगडित आहेत. भारतात मधुमेही रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक असून जगभरात ५० दशलक्षपेक्षा अधिक लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. यात टाइप-२ मधुमेह असणाऱ्या रुग्णांची संख्या खूप जास्त आहे. टाइप- २ मधुमेह होण्यामागील वाढते वजन हे मुख्य कारण आहे.

गेल्या ३० वर्षांत भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा दिसून येत आहे. या बदलत्या काळात लोकांची जीवनशैली आणि आहाराच्या पद्धतीमध्येही बदल झाला. अतिरिक्त जंकफुडचं सेवन आणि व्यायामाचा अभाव यामुळे लठ्ठपणा वाढत असून भारतामध्ये मधुमेहाच्या ९० टक्के रुग्णांना टाइप- २ प्रकारचा मधुमेह दिसून येतो. भारतात सुमारे सात कोटी सत्तर लाख मधुमेहाची रुग्ण असून निम्‍म्या लोकांना टाइप टू डायबेटीज असल्याची जाणीव नसल्याचे डॉ. प्रख्यात दीक्षित ‘डायट’चे प्रवर्तक डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी सांगितले.

जगातील बहुतांश मधुमेह तज्ज्ञांच्या संघटना ‘डायबेटीज रिव्हर्सल शक्य आहे असे म्हणतात. फक्त हे करण्यासाठी ज्या जीवनशैलीची आवश्‍यकता आहे त्याचा सल्ला मात्र दिला जात नाही. आमच्या अभियानात दोन वेळा जेवणे, ४५ मिनिटे साडेचार किलोमीटर चालणे हा सल्ला पाळल्याने शेकडो लोकांचा मधुमेह कमी झाला, त्यांची औषधी बंद झाली. भारतात सात कोटी सत्तर लाख डायबेटीज -२ चे रुग्ण आहेत. निम्‍म्यांना टाइप टू डायबेटीज असल्याचे माहीत नाही.

-डॉ. जगन्नाथ दीक्षित

(प्रख्यात दीक्षित ‘डायट’चे प्रवर्तक,

प्राध्यापक, बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे)

मधुमेहाचे प्रकार - एक

या मधुमेहास नवजात मधुमेह असे संबोधले जाते. पहिल्या प्रकारचा मधुमेह बालवयात अथवा प्रौढावस्थेमध्ये दिसून येतो. या प्रकारात इन्शुलिन शरीरात अत्यंत कमी तयार होते किंवा अजिबातच तयार होत नाही.

प्रकार दोन

दुसऱ्या प्रकारचा मधुमेह पन्नाशीनंतर जास्त शक्यता असते. मधुमेहाच्या रुग्णांपैकी नव्वद टक्के रुग्ण दुसऱ्या प्रकारात मधुमेहाचे बळी असतात. या मधुमेहास प्रौढावस्थेमधील, वयोमानानुसार होणारा मधुमेह म्हणतात. अधिक शारीरिक वजन असणाऱ्या आणि सतत बैठे काम करणाऱ्या, शारीरिक हालचाल व व्यायाम न करणाऱ्या व्यक्तींना दुसऱ्या प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते.

प्रकार तीन

गर्भधारणेतील मधुमेह : यात लक्षणे गर्भ राहिल्यापासून दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत दिसतो. दोन टक्के गर्भवती महिलांना या प्रकारातील मधुमेहाचा त्रास होतो. या मधुमेहामुळे अपुऱ्या दिवसांचे बाळ जन्मणे किंवा बाळास जन्मत: ग्लुकोज न्यूनता किंवा कावीळ अशा आजारास सामोरे जावे लागते. यावर उपचार म्हणून आहार नियंत्रण आणि इन्शुलिनची इंजेक्शन द्यावी लागतात.

loading image
go to top