शाकुंतल स्कूलमध्ये ‘स्वच्छता हीच सेवा’चा संदेश
नांदेड, ता. ४ (बातमीदार) : महात्मा गांधी जयंतीनिमित्त शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्समध्ये गुरुवारी (ता. २) स्वच्छता मोहीम उत्साहात राबविण्यात आली. ‘स्वच्छता हीच सेवा’ या भावनेतून विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसराची स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश दिला.
प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांचे विविध गट तयार करून शाळेच्या परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत परिसरातील कचरा संकलित केला. तसेच कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याचे महत्त्व याबाबत जनजागृती करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष गिरीश जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वच्छता ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता ती प्रत्येकाच्या जीवनशैलीचा भाग झाली पाहिजे, असे सांगितले. प्राचार्य सदाशिव टाकळे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. स्वच्छ परिसर, स्वच्छ विचार आणि जबाबदार नागरिकत्व यांचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. यावेळी उपाध्यक्ष दीपक जाधव, सचिव सिंधू पावडे, कोषाध्यक्ष पूजा जाधव, सहसचिव शिवकुमार बुक्के, उपप्राचार्य बार्शीकर, समन्वयक श्रीनिवास बिरादार, शिल्पा यमेकर, प्रीती भारती यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.