LTR26B15644
लातूर : कार्यक्रमात सतीश सुरवसे लिखित ‘शिरखिळा’ या कथासंग्रहाचे प्रकाशन करताना प्रा. शेषराव मोहिते, प्रा. मोग्लान श्रावस्ती, प्रा. हनुमंत मते, वीरभद्र गुळवे.
--
‘मराठी साहित्याचं विश्व दलित,
ग्रामीण साहित्यामुळे रुंदावले’
-------------
लातूर, ता. १५ : मराठी साहित्याचं विश्व खऱ्या अर्थाने ग्रामीण व दलित साहित्यामुळे रुंदावले आहे, असे प्रतिपादन साहित्यिक प्रा. शेषराव मोहिते यांनी केले.
जयक्रांती महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात सतीश सुरवसे लिखित ‘शिरखिळा’ या कथासंग्रहाचे प्रकाशन प्रा. मोहिते यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी चित्रकार प्रा. मोग्लान श्रावस्ती, ‘प्रभाकर प्रकाशना’चे वीरभद्र गुळवे, प्रा. दुष्यंत कटारे, प्रा. माधव गादेकर, चित्रकार प्रकाश घादगिने, प्रकाश वाघमारे, जी. जी. कांबळे, दिलीप गायकवाड, एन. टी. कांबळे, प्रकाश सुरवसे, शशिकला सुरवसे आदी उपस्थित होते.
प्रा. मोहिते म्हणाले, ‘‘प्रस्थापित साहित्याला नामदेव ढसाळ, राजा ढाले, दया पवार, लक्ष्मण माने, लक्ष्मण गायकवाड, रा. रं. बोराडे यांनी हादरे दिले. त्यांच्या साहित्याने मराठी साहित्याच्या कक्षा रुंदावल्या. सतीश सुरवसे यांच्या लेखनात खरेपणा आहे. साधेपणा आहे. साधेपणा जपणं, जगणं सोप्प नाही. ‘शिरखिळा’ या पुस्तकातील कथा, किस्से, घटना या त्यांनी जे अनुभवलं, भोगलं, पाहिलं त्याची अस्सल ग्रामीण लोकभाषेतील प्रचिती आहे’’.
सुरवसे यांनी आपल्या मनोगतात ‘शिरखिळा’ या पुस्तकाच्या निर्मितीमागील कहाणी सांगितली. ‘लॉकडॉऊन’मध्ये या पुस्तकाची कथा सुचली. तेव्हापासून लेखन सुरू होते. ते लेखन प्रभाकर प्रकाशनाने पुस्तकरुपाने आपल्या समोर आणले. याचा आनंद आहे. श्रावस्ती यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. हनुमंत मते यांनी सूत्रसंचालन केले. स्वाती जावळीकर यांनी आभार मानले.