गरजूंना अन्नसुरक्षा योजनेचे भक्कम कवच
शिवभोजनच्या ३८ लाख ४२ हजार थाळ्या वितरीत; २६ हजारांवर कुटुंबांना मोफत साड्या
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. ८ : वाढत्या महागाईच्या काळात गरीब आणि गरजू कुटुंबाच्या घरातील चूल पेटती राहावी, आर्थिक परिस्थितीमुळे कुणावरही उपाशी राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्था एक भक्कम आधारवड ठरत आहे. शिवभोजन, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, आनंदाचा शिधा आणि पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना यासारख्या विविध उपक्रमांतून जिल्ह्यातील लाखो नागरिकांना अन्नसुरक्षेचे कवच मिळाले असून, अंत्योदय कुटुंबांना मोफत साडी वाटपातूनही दिलासा दिला जात आहे.
.....
योजनेची फलश्रुती
योजना...लाभार्थी...मुख्य लाभ
शिवभोजन केंद्र...३८,४२,७३० थाळ्या वितरीत...१६ केंद्रांद्वारे गरजूंना भोजन
शेतकरी डीबीटी अनुदान...१,३७,५१२...प्रतिमहिना १५० रुपये बँक खात्यात
अंत्योदय अन्न योजना...३७,७८६ कुटुंबे...दरमहा ३५ किलो मोफत धान्य.
प्राधान्य कुटुंब योजना...१,०३,१९३ लाभार्थी...प्रतिलाभार्थी दरमहा ५ किलो मोफत धान्य
मोफत साडी वाटप...२६,३७४ कुटुंबे...अंत्योदय कुटुंबांना कापडी पिशवीसह मोफत साडी वाटप
.......
शिवभोजनातून ३८ लाख थाळ्यांचे वाटप
राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजना जिल्ह्यातील सर्वसामान्य आणि गरजू नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरली आहे. जिल्ह्यात सध्या १६ शिवभोजन केंद्रे सुरू असून, जुलै २०२६ अखेरपर्यंत ३८ लाख ४२ हजार ७३० थाळ्यांचे यशस्वी वितरण करण्यात आले आहे.
.....
शेतकरी कुटुंबांना ६६.६६ कोटींचे डीबीटी अनुदान
आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी जानेवारी २०२३ पासून प्रतिलाभार्थी १५० रुपये रोख हस्तांतरण केले जात आहे. जून २०२५ अखेरपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ३७ हजार ५१२ लाभार्थ्यांच्या खात्यात ६६ कोटी ६६ लाख ९२ हजार २२० रुपये थेट जमा करण्यात आले आहेत.
........
मोफत धान्य आणि अंत्योदय कुटुंबांना साडी वाटप
अंत्योदय व प्राधान्य कुटुंब : अंत्योदय योजनेतील ३७ हजार ७८६ कुटुंबांना दरमहा ३५ किलो धान्य आणि प्राधान्य कुटुंबातील १ लाख ३ हजार १९३ लाभार्थ्यांना प्रतिलाभार्थी ५ किलो मोफत धान्य ''पंतप्रधान गरीब कल्याण योजने''अंतर्गत दिले जात आहे.
अन्नधान्यासोबतच अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना कापडी पिशवीसहित मोफत साडी वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्याला प्राप्त ३७ हजार १६८ साड्यांपैकी २६ हजार ३७४ कुटुंबांपर्यंत साड्यांचे यशस्वी वितरण पूर्ण झाले आहे.